
दुसऱ्या पुरुषाशी मैत्री केल्याच्या रागातून लेक्चररने अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीची कीटकनाशक पाजून हत्या केली. थांड्रा अक्षिताराणी (20) असे या तरुणीचे नाव आहे. सुरवातीला पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा दाखल केला. मात्र सखोल तपासाअंती ही हत्याच असल्याचे निष्पन झाले. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
अक्षितारानी डिप्लोमा करत असताना तिची भेट नासपूर येथील सिंगारेनी कोलिरीज पॉलिटेक्निकमधील कंत्राटी लेक्चरर नवीन कुमार याच्याशी झाली. अक्षितारानी मायनिंग इंजिनिअरिंगची पदवी घेण्यासाठी हैदराबादला गेली आणि त्यानंतर सिंगारेनी खाणीत अप्रेंटिसशिप करत असताना तिची भेट रवी कुमारशी झाली. यानंतर नवीन कुमारसोबतचे तिचे संबंध बिघडले, असे एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
अक्षिताराणी आपल्यापासून दूर जात आहे आणि रवी कुमारशी संबंध जोडत आहे, ही गोष्ट नवीन कुमारला सहन झाली नाही, अशी माहिती मिळते. पोलिसांच्या माहितीनुसार, 12 सप्टेंबर रोजी अक्षितारानी घरी परतत असताना कुमारने तिला एफसीआय चौकाजवळ अडवले. त्याने तिला आपल्या कारमध्ये बसवून तिच्याकडून एक चिठ्ठी लिहून घेतली. या चिट्ठीत रवी कुमारवर लैंगिक अत्याचाराचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर तिला बळजबरीने कीटकनाशक पाजले. त्यानंतर त्याने तिच्या फोनवरून तिच्या वडिलांशी संपर्क साधला आणि तिने आत्महत्या केली आहे, असा समज निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
अक्षिताराणीला गोदावरीखानी सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे उपचारादरम्यान दुसऱ्या दिवशी तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी तांत्रिक तपास करत अक्षिताराणीच्या हत्येचे गूढ उकलले. या पुराव्यांमुळे नवीन कुमार हा मुख्य आरोपी असल्याचे निश्चित झाले. यानंतर पोलिसांनी 20 सप्टेंबर रोजी नवीन कुमार (38) आणि रवी कुमार (35) या दोघांना अटक केली. तपासादरम्यान एक कार आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आले.
रवी कुमारवर अक्षिताराणीने केलेल्या बळजबरीने शारीरिक संबंध ठेवल्याच्या आरोपांबाबत स्वतंत्र तपास सुरू आहे. मात्र, त्याच्या पत्नीने हे आरोप फेटाळून लावले आणि त्याला चुकीच्या पद्धतीने गोवण्यात आल्याचे म्हटले आहे.


























































