
महाराष्ट्रात सर्वाधिक दुष्काळाचा फटका लातूर व धाराशिव जिल्ह्यास बसला असल्याची कबूली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. लातूरात माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. शासन दुष्काळाची पहिली अधिसूचना लवकरच प्रसिद्ध करणार आहे असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.
लातूर, धाराशीव जिल्ह्यातील पीक-पाणी परिस्थितीच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांचे आज (दि.23) रोजी सकाळी लातूर विमानतळावर आगमन झाले, यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, लातूर व धाराशिव जिल्ह्यात केवळ ५० टक्के पाऊस झाला आहे, सोयाबीन तर पुर्णपणे गेलेले आहे. पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झालेला आहे. विहिर पाहिली , विहिरीत पण पाणी नाही. जनावरांच्या ही चाऱ्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. अतिशय दु:ख आणि आक्रोश शेतकऱ्यांमध्ये आहे. सरकार पुर्णपणे त्यांच्या पाठीशी राहणार आहे. शनिवार दुष्काळाचा जी आर काढला जाईल. शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी जी काही मदत करता येईल ती करण्यात येईल. पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा या सर्व गोष्टी राज्य सरकार करेल”, असे ते म्हणाले. तसेच यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याचा प्रयत्न केला जाईल असेही ते म्हणाले.




























































