सरकार कायद्यापासून संविधानापर्यंत प्रत्येक व्यवस्थेवर ‘बुलडोझर’ फिरवण्याचा प्रयत्न करतेय, अखिलेश यादव यांचा हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्रीय निवडणूक आयोगातील अंतर्गत मतभेद आणि वादावरून समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी केंद्र सरकारसह निवडणूक आयोगावर जोरदार निशाणा साधला आहे. “सरकार कायद्यापासून संविधानापर्यंत प्रत्येक व्यवस्थेवर ‘बुलडोझर’ फिरवण्याचा प्रयत्न करत आहे,” असा घणाघाती आरोप केला.

”सरकार प्रत्येक पातळीवर मनमानी कारभार करत आहे. कायदा, नियम किंवा संविधान असो, सर्वांना पायदळी तुडवण्याची सरकारची वृत्ती आहे. ‘एसआयआर’च्या (SIR) नावाखाली विरोधकांची मते मोठ्या प्रमाणावर कापण्यात आली आहेत. लोकशाहीचा खेळखंडोबा सुरू आहे”, असे अखिलेश यादव म्हणाले.

अखिलेश यादव यांनी निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर गंभीर सवाल उपस्थित केले. “निवडणूक आयोग आता निष्पक्ष राहिलेला नाही. तो नेमका कोणाच्या इशाऱ्यावर काम करत आहे? निवडणूक आयोगाचे निर्णय इतर अधिकाऱ्यांना मान्य नव्हते, ही बाब आता समोर आली आहे. अशा परिस्थितीत निवडणूक आयोग निष्पक्ष राहिला असेल का, याची तुम्ही कल्पना करू शकता? या काळात जी सरकारे सत्तेत आली, ती असंवैधानिक आहेत. सत्तेत टिकून राहण्यासाठी लोकशाहीच्या चिंधड्या उडवल्या जात आहेत,” असा घणाघात त्यांनी केला.

अखिलेश यादव पुढे म्हणाले की, “निवडणूक आयोगाकडून देशाला मोठ्या अपेक्षा होत्या. परंतु, गेल्या १० महिन्यांत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तब्बल १४ वेळा आक्षेप नोंदवले आहेत. यावरूनच लक्षात येते की ही संस्था आता स्वायत्त राहिलेली नाही. निवडणूक आयोगाने जाणीवपूर्वक समाजवादी पक्षाच्या मतदारांची नावे मतदार यादीतून वगळल्याचा आरोप मी यापूर्वीही केला होता. लेखी तक्रारी देऊनही कोणतीही कारवाई झाली नाही.”