
सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात देवरुख-रत्नागिरी मार्गांवरील आंबव येथे गव्याने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेले साडवली येथील तरुण स्वप्नील पेडामकर यांचे उपचारादरम्यान दुर्दैवी निधन झाले होते. या अत्यंत दुःखद घटनेनंतर वनविभागाने तत्परता दाखवत पीडित पेडामकर कुटुंबाला 10 लाख रुपयांच्या आर्थिक मदतीचा धनादेश आज त्यांच्या आईकडे सुपूर्द केला. रत्नागिरी-चिपळूणच्या विभागीय वनअधिकारी गिरिजा देसाई आणि सहाय्यक वनसंरक्षक प्रियांका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली हा मदतनिधी हस्तांतरित करण्यात आला.
या दुर्दैवी घटनेनंतर पीडित कुटुंबाला लवकरात लवकर शासकीय मदत मिळवून देण्यासाठी स्थानिक ‘सह्याद्री नगर मित्रमंडळा’ने अत्यंत संवेदनशील पाऊल उचलत आपला पारंपरिक दहीहंडी उत्सव रद्द केला होता. दहीहंडीचा तो संपूर्ण निधी स्वप्नीलच्या उपचारासाठी देण्यात आला होता; मात्र दुर्दैवाने उपचारादरम्यान स्वप्नीलची प्राणज्योत मालवली.
धनादेश सुपूर्द करताना वनविभाग व स्थानिक स्तरावरील अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये वनविभाग अधिकारी: परिक्षेत्र वन अधिकारी (रत्नागिरी) विक्रम गुरव, संगमेश्वर-देवरुखचे वनपाल सागर गोसावी, वनरक्षक सहयोग कराडे (साखरपा), आकाश कडूकर (फुणगुस), सुरज तेली (आरवली) आणि सुप्रिया काळे (दाभोळे). तसेच सुरेश बने, पप्पू नाखरेकर, संजय लाड, पापा शेठ भिंगार्डे, बंधू सुर्वे, विनोद वाडकर, सचिन मांगले, प्रमोद सुर्वे, निलेश भुवड, भाई चव्हाण, विशाल भानुशाली यांसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. वनविभागाने वेळेत दिलेल्या या मदतीमुळे पेडामकर कुटुंबाला थोडा आधार मिळाला असला, तरी स्वप्नीलच्या जाण्याने साडवली व देवरुख परिसरात अजूनही हळहळ व्यक्त केली जात आहे.


























































