
दूध हे आपल्या दैनंदिन आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहे. ज्याला आपण पूर्णान्न मानले जात असल्यामुळे विशेषतः लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच रोज दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, अशा या महत्त्वाच्या घटकात जर भेसळ असेल, तर ही अत्यंत चिंतेची बाब आहे. आजकाल दुधात विविध केमिकल्स आणि मुख्य म्हणजे डिटर्जंटची भेसळ केल्याच्या घटना समोर येत आहेत. केवळ नफा कमावण्यासाठी आणि दूध जास्त वेळ ताजे व घट्ट दिसावे यासाठी असा गैरप्रकार केला जात असल्याचे उघडकीस आले आहे. तुम्ही घरी आणलेले दूध शुद्ध आहे की त्यात डिटर्जंट मिसळले आहे, हे ओळखण्यासाठी FSSAIने अत्यंत सोपी घरगुती चाचणी सांगितली आहे.
अशी करा डिटर्जंट भेसळीची चाचणी:
- एका पारदर्शक ग्लासात किंवा बाटलीत ५ ते १० मिली दूध घ्या.
- चमच्याच्या साहाय्याने किंवा बाटली हलवून हे दूध वेगाने ढवळा.
- दुधात मोठ्या प्रमाणावर फेस तयार झाला आणि तो फेस तसाच राहिला, तर त्या दुधात डिटर्जंटची भेसळ असल्याचे स्पष्ट होते.
- सामान्य आणि शुद्ध दुधात असा फेस तयार होत नाही. दूध ढवळल्यामुळे थोडेफार बुडबुडे आले तरी ते लगेचच नष्ट होतात.
- दुधात डिटर्जंट, स्टार्च किंवा युरियाची भेसळ आहे की नाही हे पाहण्यासाठी तुम्ही ‘आयोडीन टिंचर’चाही वापर करू शकता. सर्वप्रथम दूध चांगले उकळून पूर्णपणे थंड होऊ द्या.
- थंड झालेल्या दुधात आयोडीन टिंचरचे काही थेंब टाका.
- जर दुधाचा रंग गडद निळा झाला, तर दुधात भेसळ असल्याचे समजावे.
दूध खरेदी करताना घ्यावयाची काळजी:
- अनेकदा बनावट दूध विकणारे नामांकित ब्रँडच्या नावाशी मिळत्या-जुळत्या नावाचे किंवा लोगोचे पॅकेट वापरतात. त्यामुळे पॅकेटवरील स्पेलिंग आणि लोगो नीट तपासून घ्या.
- दुधाचे पॅकेट खरेदी करताना त्यावर FSSAI चा अधिकृत लोगो आणि वैध लायसन्स नंबर आहे की नाही हे नक्की पाहा.
- अधिक मार्जिन मिळत असल्याने अनेकदा दुकानदार अनोळखी किंवा लोकल ब्रँडचे दूध विकण्याचा प्रयत्न करतात. अशा अनधिकृत पॅकेटचे दूध खरेदी करणे टाळावे.


























































