
संगमेश्वर तालुक्यातील नायरी गावातील मोबाईल नेटवर्कची समस्या तातडीने सोडवावी, अशी मागणी ग्रामस्थांनी भारत संचार निगम लिमिटेड भारत संचारच्या संगमेश्वर विभागीय व्यवस्थापकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मोबाईल कनेक्टिव्हिटी अत्यंत खराब असून, अनेकदा मोबाईल सेवा पूर्णपणे बंद राहत असल्याने ग्रामस्थांना दैनंदिन जीवनात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. आजच्या डिजिटल युगात मोबाईल नेटवर्क ही अत्यावश्यक सेवा बनली आहे. मात्र, नायरी गावात नेटवर्कअभावी विद्यार्थ्यांचे शिक्षण, ऑनलाइन बँकिंग, शासकीय कामे तसेच तातडीच्या वैद्यकीय प्रसंगी संपर्क साधणे कठीण झाले असल्याचे ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिले आहे.
गावातील नेटवर्कची समस्या वारंवार निदर्शनास आणून देऊनही प्रशासनाकडून गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याची नाराजी ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. विशेषतः आपत्कालीन परिस्थितीत फोन न लागल्याने नागरिकांच्या अडचणी अधिक गंभीर होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.नायरी गावातील मोबाईल नेटवर्कची समस्या तात्काळ सोडवण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच, येत्या दोन महिन्यांत बी एस एन एलची मोबाईल सेवा सुरळीत झाली नाही, तर नायरी गावातील सर्व ग्रामस्थ रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील, असा स्पष्ट इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
या आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीस प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. त्यामुळे प्रशासनाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्वरित योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.मोबाईल नेटवर्क ही आता चैनीची नव्हे, तर अत्यावश्यक सेवा झाली आहे. त्यामुळे नायरीसारख्या गावातील नागरिकांना त्यापासून वंचित ठेवणे योग्य नाही. प्रशासनाने तातडीने दखल घेऊन नेटवर्कची समस्या कायमस्वरूपी सोडवावी,” अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.


























































