
हिंदुस्थानच्या नेमबाजांनी स्किट प्रकारात अचूक नेम साधत आशियाई क्रीडा स्पर्धेच्या मैदानात पुन्हा एकदा तिरंगा उंचावला. महिलांमध्ये परिनाज धलिवाल, रायझा धिल्लोन आणि माहेश्वरी चौहान या नेमबाजी त्रिकुटाने एकत्रित 331 गुणांची कमाई करीत करत कांस्यपदकावर निशाणा साधला, मात्र रायझाचे वैयक्तिक कांस्यपदक थोडक्यात हुकले. अनंतजीत सिंग नरुका, मैराज अहमद खान आणि भावतेघ सिंग गिल यांच्या पुरुष संघानेही स्किटमध्ये कांस्यपदक जिंकले.
स्पर्धेत पाच पात्रता फेऱ्यांमध्ये हिंदुस्थानी नेमबाजांनी संयमी आणि अचूक कामगिरी केली. परिनाज आणि रायझाने प्रत्येकी 111 लक्ष्यभेद, तर माहेश्वरीने 109 लक्ष्यभेद करत हिंदुस्थानच्या पदकाची बेरीज पूर्ण केली. चीनने 357 लक्ष्यभेदांसह सुवर्णपदक पटकावत स्पर्धेत विक्रमाला गवसणी घातली. कझाकिस्तानला 336 लक्ष्यभेदांसह रौप्यपदक मिळाले. दक्षिण कोरिया 324 गुणांसह चौथ्या, तर यजमान जपान 321 गुणांसह पाचव्या स्थानावर राहिला.
पुरुष स्किट संघाचीही दमदार कामगिरी
हिंदुस्थानच्या पुरुष स्किट संघानेही कांस्यपदक जिंकले. अनंतजीतने वैयक्तिक स्पर्धेतही उत्कृष्ट कामगिरी केली. पात्रता फेरीत संयुक्तपणे चौथे स्थान मिळवून त्याने अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. हिंदुस्थानी संघाने अंतिम फेरीत एकूण 346 गुण मिळवून कांस्यपदक जिंकले. कुवेतने 348 गुणांसह रौप्य पदक पटकावले, तर कतार संघाने 353 गुणांसह सुवर्णपदक जिंकण्यात यश मिळवले. अनंतजीतनेही या स्पर्धेच्या वैयक्तिक अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवली आहे. यापूर्वी, हिंदुस्थानी महिला स्किट संघानेही याच स्पर्धेत देशासाठी कांस्य पदक जिंकले होते.





























































