
राष्ट्रीय कर्करोग गुलाब दिनानिमित्त वांद्रे-वरळी सागरी सेतू म्हणजेच सी लिंकवर लाल रंगाची आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. कर्करोगाविरुद्ध लढा देणाऱया रुग्णांना, कर्करोग योद्धा आणि त्यांच्या कुटुंबांना आशा आणि धैर्याचा संदेश देण्यासाठी ‘कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन’च्या (सीपीएए) वतीने हा उपक्रम राबवण्यात आला.
उपक्रमांतर्गत दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे कर्करुग्ण आणि कर्करोग योद्धा एकत्र आले होते. या सर्वांनी हातात लाल गुलाबाचे फुल घेऊन कर्करोगाविरुद्धच्या लढय़ात समाज खंबीरपणे आपल्या पाठीशी उभा आहे असा संदेश देण्यात आला. कर्करुग्णांचा आत्मविश्वास वाढवणे आणि समाजात जनजागृती करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याची माहिती कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशनने दिली. दरम्यान, सेतूवरील लाल रोषणाईने संपूर्ण मुंबईकरांचे लक्ष वेधून घेतले होते.






























































