एक्स्प्रेसच्या धडकेत प्रवाशाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एक्स्प्रेसच्या धडकेत रेल्वे प्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना पळसधरी स्थानकाजवळ घडली. सखाराम हिलम असे मृताचे नाव असून ते शिरसे आदिवासी वाडी येथे राहणारे होते. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

शिरसे आदिवासी वाडी येथील सखाराम हिलम हे नेहमीप्रमाणे पळसधरी स्थानकावरून लोकलने खोपोली येथे नोकरीसाठी जात होते. मंगळवारी सकाळी रेल्वे रूळ ओलांडताना त्यांना एक्स्प्रेसने धडक दिली. ही घटना पळसधरी स्थानकापासून सुमारे २०० मीटर अंतरावर घडली. रेल्वे पोलिसांनी त्यांना तातडीने कर्जत उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. याचा अधिक तपास रेल्वे पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत देसाई करीत आहेत.

कुंपणाचा प्रस्ताव

– कर्जत आरपीएफ आणि जीआरपी प्रशासन नेहमीच प्रवाशांना रेल्वे रूळ ओलांडू नका, असे आवाहन करतात. मात्र त्यानंतरही काही प्रवासी आपला जीव धोक्यात घालून रेल्वे रूळ ओलांडतात. त्यामुळे अपघात वाढले आहेत.

– रेल्वे मार्गाच्या बाजूला कुंपण घालण्यासाठी वरिष्ठांकडे प्रस्ताव दिला आहे. कुंपणाचे काम झाले तर अपघाताला आळा बसेल. तसेच मोकाट जनावरेही रुळावर येणार नाहीत, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.