सप्लाय बेस प्लँट गुजरातला हलवणार नाही, 600 कामगारांच्या बेमुदत काम बंद आंदोलनापुढे ओएनजीसी प्रशासन झुकले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ओएनजीसीचा सप्लाय बेस प्लँट गुजरात येथील पिपावाव येथे हलवण्याचा प्रशासनाचा घाट कामगारांनी उधळून लावला आहे. १७ कामगारांना कामावरून कमी केल्यानंतर सुमारे ६०० कामगारांनी ओएनजीसीत आठ दिवस काम बंद आंदोलन छेडले. या बेमुदत आंदोलनापुढे प्रशासनाला अखेर झुकावे लागले आहे. सप्लाय बेस प्लँट गुजरातला हलवला जाणार नाही, असे आश्वासन प्रशासनाने दिल्यानंतर कामगारांनी आज आपले आंदोलन मागे घेतले.

जेएनपीए बंदराला लागूनच न्हावा येथे ओएनजीसीचा सप्लाय बेस प्लँट आहे. ४५ वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या या प्रकल्पातून समुद्रात असलेल्या ओएनजीसीच्या तेल, गॅस विहिरींच्या ‘मुंबई हाय’ पर्यंत अवजड मशिनरी, पाईप, सिमेंट आदी विविध मालांची जहाजातून मोठ्या प्रमाणावर वाहतूक केली जाते. न्हावा येथील ओएनजीसी कंपनीत अनेक वर्षे कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या १७ कामगारांना कामावरून अचानक काढले आहे. त्यामुळे ६०० कामगारांनी आठ दिवसांपासून काम बंद आंदोलन पुकारले. प्रवेशद्वारावरच ठिय्या मांडला. कंत्राटी कामगार संघर्ष समिती आणि सर्व पक्षीयांच्या पाठिंब्यावर एकजुटीने सुरू करण्यात आलेल्या आंदोलनात कामगार नेते महेंद्र घरत, कामगार, ग्रामस्थांसह मोठ्या संख्येने महिलाही सहभागी झाल्या होत्या. या आंदोलनामुळे कामकाज ठप्प झाले होते.

न्हावा येथील ओएनजीसी व्यवस्थापनाने कामगारांच्या मागण्या मान्य केल्या. ओएनजीसीचा सप्लाय बेस प्लँट गुजरातला न हलवण्याची हमी दिली. त्यामुळे आंदोलन मागे घेत असल्याची माहिती युनियनचे सचिव व्यंकटेश स्वामी व ओएनजीसीचे अधिकारी विमल कुमार यांनी दिली.

सप्लाय बेस प्रकल्पच गुजरातमधील पिपावाव येथे हलविण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. एक वर्षापूर्वी ओएनजीसीच्या न्हावा सप्लाय बेस येथील जेट्टी रिव्हॅम्पिंगच्या नावाखाली येथील ४० टक्के कामकाज पिपावाव येथे हलविण्यात आले आहे.