
मलबार हिल येथील ऐतिहासिक जलाशयाच्या पुनर्बांधणी कामासाठी प्रकल्प सल्लागाराने तयार केलेल्या सुधारित प्रस्तावाच्या पुनरावलोकनासाठी ‘आयआयटी रुरकी’ या संस्थेची नेमणूक करण्यात आली आहे. या संस्थेला 22 लाख रुपये सल्लागार शुल्क देण्याच्या प्रस्तावाला महापालिकेच्या स्थायी समितीने मंजुरी दिली. फिरोजशाह मेहता गार्डन येथील हा इंग्रजकालीन जलाशय अद्याप सुस्थितीत असताना आणि पाणीपुरवठा सुरळीत सुरू असताना त्याच्या पुनर्बांधणीची गरज काय, असा सवाल काँग्रेसचे अशरफ आझमी यांनी उपस्थित केला. तसेच स्थानिक आयआयटी मुंबई उपलब्ध असताना आयआयटी रुरकीची निवड का करण्यात आली आणि किती झाडे तोडली जाणार, असा प्रश्न मनसेचे यशवंत किल्लेदार यांनी विचारला. विरोधकांच्या आक्षेपानंतरही 22 लाखांच्या या शुल्काचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.






























































