विसर्जनानंतर अर्धवट मूर्तींचे फोटो काढणे पडणार महागात; पोलिसांचा कायदेशीर कारवाईचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विसर्जनानंतर गणपतीच्या अर्ध्या विरघळलेल्या मूर्ती भरतीमुळे किनाऱयावर वाहून येतात, अथवा काही मूर्ती पाण्यावर तरंगतात. अशा मूर्तींचे फोटो काढून ते समाज माध्यमांवर प्रसारित करणाऱ्यांनो सावधान! धार्मिक भावना दुखावणारा हा प्रकार करणाऱ्यांवर पोलीस कायदेशीर कारवाई करणार आहेत.

दीड, पाच दिवसांचे, गौरी गणपती व अनंत चतुर्दशीला गणपतीचे विसर्जन होत असते. विसर्जनानंतर अनेक ठिकाणी मूर्ती पूर्णपणे पाण्यात न विरघळल्याने त्या भरतीच्या वेळेस किनाऱ्यावर वाहून येतात, तर काही मूर्ती पाण्यावर तरंगताना आढळतात. काही जण अशा मूर्तींचे फोटो काढून ते प्रकाशित किंवा प्रसारित करतात. यातून धार्मिक भावना दुखावून सामाजिक तेढ अथवा शांतता भंग होण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे मुंबई पोलिसांनी याची विशेष खबरदारी घेतली आहे. धार्मिक भावना दुखविण्याचे प्रकार घडू नयेत याकरिता गणपती मूर्तीचे अर्धवट अथवा तरंगणारे फोटो प्रसारित करू नयेत, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. जो कोणी असा उद्दामपणा करताना सापडेल त्याच्यावर भारतीय न्याय संहिता, 2023 च्या कलम 223 अन्वये कारवाई करण्यात येणार आहे. पोलिसांनी तसा आदेशच जारी केला असून तो 22 ते 26 सप्टेंबर या कालावधीत मुंबई शहरात लागू राहणार आहे.