
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध गणेश मंडळांचे आकर्षक देखावे पाहण्यासाठी दररोज सायंकाळी शहरातील विविध भागांत नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. मात्र, वाढत्या गर्दीच्या तुलनेत शहरातील वाहतूक व्यवस्थेचे पुरेसे नियोजन नसल्याने अनेक प्रमुख रस्त्यांवर वाहतूककोंडीची समस्या निर्माण होत आहे. त्यातच जड वाहतुकीमुळे या कोंडीत आणखीच भर पडत आहे. त्यामुळे गणेशभक्तांसह वाहनचालकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
गणेशोत्सवातील देखावे पाहण्यासाठी सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. कुटुंबांसह महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलेही मोठ्या संख्येने देखावे पाहण्यासाठी बाहेर पडत आहेत. अनेक ठिकाणी नागरिकांकडून वाहने रस्त्याच्या कडेला किंवा उपलब्ध जागेत उभी केली जात असल्याने रस्त्याची वाहतूक क्षमता कमी होत आहे. त्यातच प्रमुख मार्गांवर एकाचवेळी मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ वाढत असल्याने वाहतूक संथ होऊन कोंडी निर्माण होत आहे.
शहरातील काही भागांमध्ये सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत अवजड वाहनेही प्रवेश करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. एका बाजूला गणेशभक्तांची मोठी गर्दी आणि दुसरीकडे अवजड वाहनांची सुरू असलेली वाहतूक, यामुळे काही ठिकाणी वाहतूककोंडी अधिक तीव्र होत आहे. परिणामी, कमी अंतर पार करण्यासाठीही वाहनचालकांना अपेक्षेपेक्षा अधिक वेळ लागत असून, नागरिकांची गैरसोय होत आहे.
गणेशोत्सवाच्या काळात शहरातील प्रमुख गणेश मंडळांचे देखावे पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी वाहतूक वळविणे, पर्यायी मार्ग उपलब्ध करून देणे, वाहनतळांची व्यवस्था करणे, प्रभावी रहदारी नियमन करणे तसेच प्रमुख चौकांवर अतिरिक्त वाहतूक पोलिसांची नियुक्ती करणे आवश्यक आहे. सायंकाळी गर्दी वाढण्यास सुरुवात झाल्यानंतर वाहतूककोंडी निर्माण झाल्यावर उपाययोजना करण्याऐवजी गर्दीच्या वेळेपूर्वीच वाहतूक नियोजन करणे आवश्यक आहे. प्रमुख चौक, गणेश मंडळांचे देखावे असलेले मार्ग तसेच गर्दीची शक्यता असलेल्या ठिकाणी वाहतूक पोलिसांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून वाहतूक सुरळीत ठेवावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
वाहतूककोंडी टाळण्यासाठी गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनीही स्वयंसेवकांच्या माध्यमातून वाहनांच्या शिस्तबद्ध पार्किंगची व्यवस्था करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. नागरिकांनीही शक्यतो रस्त्यावर वाहने उभी करू नयेत तसेच गर्दीच्या मार्गांवर जाण्याऐवजी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
अहिल्यानगर शहरातील पुणे बसस्थानकावरून बाहेर पडलेली एसटी बस वाटेतच बंद पडली. त्यामुळे स्वस्तिक चौकात वाहतूककोंडी झाल्याने ‘राजयोग प्रतिष्ठान’चा देखावा पाहण्यासाठी आलेल्या गणेशभक्तांना त्रासाला सामोरे जावे लागले.






























































