
जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत हिंदुस्थानच्या घोडदौड सुरू आहे. सहाव्या दिवशी हिंदुस्थानच्या रोशिबिना देवी हिने वुशू या क्रीडा प्रकारात ऐतिहासिक कामगिरी केली. महिलांच्या 60 किलो सांडा प्रकारात रौप्य पदक जिंकले. विशेष म्हणजे आशियाई क्रीडा स्पर्धेत सलग तीन पदक जिंकणारी रोशिबिना पहिली वुशू खेळाडू ठरली आहे.
आयची प्रीफेक्चरल मार्शल आर्ट्स हॉलमध्ये पार पडलेल्या अंतिम सामन्यात 25 वर्षीय रोशिबिनाला चीनच्या झांग जिओयूकडून 0-2 असा पराभव स्वीकारावा लागला. चिनी खेळाडूच्या आक्रमक चढायांसमोर रोशिबिनाचा बचाव तोकडा पडल्याने तिला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
रोशिबिनाने आशियाई खेळांमधील आपल्या पदकांचा प्रवास 2018 मधील जकार्ता स्पर्धेत कांस्यपदक जिंकून सुरू केला होता. त्यानंतर तिने 2023 च्या हँगझोऊ आशियाई खेळात आपल्या कामगिरीत सुधारणा करत रौप्य पदक पटकावले होते. आता 2026 च्या स्पर्धेत पुन्हा रौप्य पदकाची पुनरावृत्ती करत तिने पदकांची हॅटट्रिक पूर्ण केली आहे.
Bishnupur, Manipur: Indian Wushu player Naorem Roshibina Devi has won the silver medal in the women’s 60kg sanda event at the 2026 Asian Games in Aichi-Nagoya, Japan. In the gold-medal bout, she faced a tough defeat against China’s Zhang Xiaoyu, losing the match 0-2.
Naorem Damu… pic.twitter.com/Ko1kvDaQdo
— ANI (@ANI) September 24, 2026
यापूर्वी हँगझोऊ येथे रौप्य जिंकून रोशिबिनाने वांगखेम संध्याराणी देवीच्या विक्रमाशी बरोबरी केली होती. संध्याराणीने 2010 च्या ग्वांगझू आशियाई खेळात 60 किलो सांडा प्रकारात रौप्य जिंकले होते. आशियाई खेळांच्या इतिहासात वुशूमध्ये रौप्य पदक मिळवणारी रोशिबिना ही केवळ दुसरी हिंदुस्थानी खेळाडू ठरली आहे.
दरम्यान, रोशिबिनाचे हे रौप्य पदक यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेमधील हिंदुस्थानी वुशू संघाचे एकमेव पदक ठरले आहे. हिंदुस्थानच्या सात सदस्यीय वुशू पथकाचे सांडा आणि ताओलू या दोन्ही प्रकारांतील आव्हान आता संपुष्टात आले आहे. इतर खेळाडूंमध्ये सांडा प्रकारात पुरुषांच्या 56 किलो वजनी गटात आर्यनचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले.
Asian Games 2026 – जय मीनाने इतिहास रचला, सॉफ्ट टेनिसमध्ये पटकावले पहिले पदक
महिलांच्या 52 किलो गटात अपर्णा आणि पुरुषांच्या 75 किलो गटात विक्रांत बालियान यांना 16 जणांच्या फेरीतच पराभवाचा सामना करावा लागला. ताओलू प्रकारात तिसऱ्यांदा आशियाई खेळात सहभागी झालेल्या मयांगलमबम सूरज सिंगला पुरुषांच्या चांगक्वान प्रकारात 11 व्या स्थानावर समाधान मानावे लागले. याच प्रकारात महिलांमध्ये न्येमान वांगसू 15 व्या स्थानावर राहिली, तर हंजाबम लांग्लेनतोम्बी देवीने महिलांच्या नानक्वान व नानदाओ संयुक्त प्रकारात 9 वे स्थान मिळवले.
वेटलिफ्टिंगमधील पदकाचा दुष्काळ संपला, मीराबाई चानूने 28 वर्षांनंतर जिंकले रौप्यपदक



























































