
भरधाव खासगी बसला आग लागल्याची घटना मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर रसायनी परिसरात आज सकाळी घडली. चालकाने प्रसंगावधान राखत बस रस्त्याच्या बाजूला घेतली आणि सर्व प्रवाशांना तातडीने खाली उतरवले. त्यामुळे बसमधून प्रवास करणारे सर्वच प्रवासी बालबाल बचावले. प्रवासी बसमधून बाहेर आल्यानंतर काही क्षणांत संपूर्ण बस आगीच्या विळख्यात सापडली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पनवेल महापालिका आणि खोपोली नगर पालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन ही आग तासाभरात आटोक्यात आणली. या दुघर्टनेमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
राजस्थानमधील उदयपूर येथून पुण्याच्या दिशेने निघालेल्या एपी -४४, झेडबी-६७७६ या क्रमांकाच्या खासगी बसने आज सकाळी सातच्या सुमारास मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर प्रवेश केला. ७ वाजून २० मिनिटांनी ही बस मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर रसायनी परिसरातील रिसवाडी गावाजवळ आली असता बसला अचानक आग लागली. वायरिंग जळल्याचा वास येऊ लागल्यानंतर चालकाने तातडीने बस रस्त्याच्या बाजूला घेऊन थांबवली. त्यावेळी आगीच्या ज्वाळा त्याच्या निदर्शनास आल्या. त्याने तातडीने १४ प्रवाशांना बसमधून खाली उतरवले. प्रवासी बसमधून खाली आल्यानंतर काही क्षणांत संपूर्ण बस आगीच्या विळख्यात सापडली. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेच्या पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर मोठा आगडोंब उसळला.
या आगीची माहिती मिळाल्यानंतर पनवेल महापालिका आणि खोपोली नगर पालिकेचे अग्निशमन जवान अग्निशमन बंबांसह घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने ही आग तासाभरात आटोक्यात आणली.
चालकाने प्रसंगावधान राखत बस थांबवली आणि सर्वच प्रवाशांना तातडीने खाली उतरवले. त्यामुळे या आगीत कोणालाही दुखापत झाली नाही. बसचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याप्रकरणी रसायनी पोलीस पुढील तपास करीत आहेत.
बसला आग लागल्यानंतर चालकाने ही बस तातडीने रस्त्याच्या बाजूला घेतली. त्यामुळे या दुर्घटनेचा अन्य वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नाही, असे रसायनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिजित भुजबळ यांनी सांगितले.
आग विझवल्यानंतर रसायनी पोलीस आणि पाताळगंगा अग्निशमन दलाच्या जवानांनी या बसची पाहणी केली. बसच्या वातानुकूलित यंत्रात बिघाड झाल्यामुळे ही आग लागली असल्याचा संशय पोलीस आणि अग्शिनमन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
ही दुर्घटना घडल्यानंतर बस ऑपरेट करणाऱ्या कंपनीने तातडीने दुसरी बस उपलब्ध करून या १४ प्रवाशांना पुण्याच्या दिशेने रवाना केले.































































