
डोंबिवलीतील महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात शिंदे गटाचा नगरसेवक रमेश म्हात्रे याने डॉक्टरांना बेदम मारहाण केली होती. या मारहाणप्रकरणी कल्याण न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याला वेग आला आहे. आज न्यायालयात रुग्णालयातील सीसीटीव्ही जप्त केलेल्या सरकारी पंचांची साक्ष नोंदवण्यात आली.
किरकोळ कारणावरून शास्त्रीनगर रुग्णालयात रमेश म्हात्रे याच्यासह त्याच्या गुंड कार्यकर्त्यांनी डॉ. सृष्टी बाविस्कर, डॉ. वैभव साळुंखे आणि नर्सना बेदम मारहाण केली होती. या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयानेही गंभीर दखल घेतली होती. मारहाणीच्या घटनेनंतर रमेश म्हात्रे याच्यासह प्रमोद निकम, रमेश पवार, अक्षय करांडे आणि साधना करांडे अशा पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली. पैकी चार आरोपी जामिनावर असून साधना करांडे या न्यायालयीन कोठडीत आहेत. आज कल्याण न्यायालयात न्यायमूर्ती एन. पी. वासाडे यांच्यासमोर सुनावणीदरम्यान केडीएमसीच्या उपअभियंत्याची सरकारी पंच म्हणून साक्ष नोंदवण्यात आली. शास्त्रीनगर रुग्णालयातून पोलिसांनी जप्त केलेले डीव्हीआर (सीसीटीव्ही) आपण ओळखले असून ते जप्त करण्यात आले त्यावेळी आपण पंच म्हणून उपस्थित होतो, अशी साक्ष संबंधित पंचांनी न्यायालयात दिली. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अॅड. प्रकाश सालसिंगीकर यांनी बाजू मांडली.
सुनावणीत फिर्यादी डॉ. वैभव साळुंखे यांची साक्ष महत्त्वाची ठरणार असल्याने ३ ऑक्टोबरच्या सुनावणीकडे लक्ष लागले आहे. फिर्यादी न्यायालयात हजर राहणार असल्याने त्या दिवशी न्यायालय परिसरात सुरक्षिततेच्या दृष्टीने विशेष पोलीस बंदोबस्त ठेवला जाणार आहे.































































