
गणेशनगर परिसरात घरातील स्नानगृहात पाण्याच्या टबमध्ये पडून दोन वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. खेळता खेळता स्नानगृहात गेलेल्या चिमुकल्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
टिटवाळा पूर्वेतील गणेशनगरमधील अविदर्शन सोसायटीत यादव कुटुंबीय राहतात. त्यांचा दोन वर्षांचा मुलगा युवांश यादव रविवारी रात्री घरात खेळत होता.
रात्री साडेनऊच्या सुमारास युवांशची आई स्वयंपाकघरात काम करत असताना तो अचानक स्नानगृहात गेला. स्नानगृहातील पाण्याच्या टबमध्ये खेळत असताना तो पाण्यात पडला असावा, अशी प्राथमिक शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. जेवण झाल्यानंतर युवांशच्या आईने स्नानगृहात पाहिले असता तो टबमधील पाण्यावर तरंगताना दिसला. दरम्यान कुटुंबीयांनी त्याला तातडीने टिटवाळ्यातील कृष्णा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्यानंतर तेथील डॉक्टरांनी युवांशचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या प्रकरणाचा अधिक तपास महात्मा फुले पोलीस करत आहेत.































































