शिक्षिकेच्या बदलीसाठी पीएने मागितले दीड लाख, लाच प्रकरणात झेडपीच्या अध्यक्षांचा सहभाग आहे का? चौकशी करा, शिवसेनेची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिक्षिकेच्या बदलीसाठी दीड लाखाची लाच घेताना रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांचे स्वीय सचिव योगेश भस्मे याला रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत विभागाच्या या कारवाईने सत्ताधारी भाजपची चांगलीच गोची झाली असून ही वसुली नेमकी कुणाच्या आशीर्वादाने सुरू होती, असा सवाल केला जात आहे. दरम्यान या प्रकरणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आवाज उठवत लाचलुचपत विभागाने केवळ भस्मे यांचीच चौकशी न करता या प्रकरणात झेडपीच्या अध्यक्षांचा काही सहभाग आहे का, याची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. यासंदर्भातील लेखी पत्रच शिवसेनेचे मावळ लोकसभा व रायगड जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर यांनी लोकायुक्तांसह लाचलुचपत विभागाचे रायगड जिल्हा पोलीस उपअधीक्षक यांना दिले आहे.

तळा तालुक्यात बदली झालेल्या शिक्षिकेला सुधागड तालुक्यात बदली हवी होती. यासाठी झेडपीचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांचे पीए योगेश भस्मे यांची भेट घेतली असता भस्मे याने ‘साहेबांना सांगून शाळा बदलून देतो,’ असे सांगितले. मात्र त्यासाठी दीड लाखाची मागणी केली. याबाबत शिक्षिकेच्या पतीने तक्रार केल्यानंतर लाचलुचपत विभागाने लाच स्वीकारतानाच भस्मे याला रंगेहाथ पकडले.

तपास भस्मेपुरता मर्यादित ठेवू नका !
शिवसेनेचे संपर्कप्रमुख प्रसाद भोईर यांनी लाच प्रकरणात केवळ भस्मे याच्यापुरताच तपास न करता मंगेश वाकडीकर यांच्यासंदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नांच्या अनुषंगानेदेखील चौकशी केली जावी, अशी मागणी केली आहे. भस्मे याने मागितलेली लाच वाकडीकर यांच्या नावाने, निर्देशाने किंवा त्यांच्यासाठी मागितली होती का, याचाही तपास करावा. वाकडीकर यांनी स्वतः पैसे घेतले नाहीत. एवढ्या एका कारणावरून त्यांच्या भूमिकेकडे कानाडोळा करू नये, असे पत्रात नमूद केले आहेत. महत्त्वाचे म्हणजे बदलीसंदर्भात वाकडीकर व भस्मे यांच्यात काही संभाषण झाले आहे का, याचा तपास करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्रसाद भोईर यांनी केली आहे. बदली फाइल, टिपणी, शिफारशी, मंजुरी व फाइलच्या हालचालींची नोंद घेऊन वाकडीकर यांनी संबंधित प्रकरणात तोंडी किंवा लेखी सूचना केल्या होत्या का, हे सक्षम बदली प्राधिकारी तसेच अन्य अधिकाऱ्यांच्या जबाबाची पडताळणी करतानाच सीसीटीव्ही आणि कार्यालयीन अभिलेख तातडीने सुरक्षित करावी, अशी मागणीदेखील त्यांनी केली आहे. दरम्यान भस्मे याला गुरुवारी जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.