
नेरळकरांच्या नळाला तीन दिवसांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गेल्या वर्षी आठ लाख रुपये खर्च करून फिल्टर प्लाण्टची दुरुस्ती करण्यात आली. मात्र तरीही गढूळ पाणी येत असल्याने हा प्लाण्ट कुचकामी ठरला आहे. तहान भागवण्यासाठी नागरिकांना बिसलरीचा आधार घ्यावा लागत आहे. याबाबत अनेकदा तक्रारी करूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे संताप व्यक्त होत आहे.
रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या नेरळ ग्रामपंचायतीच्या बेभरोसे कारभारामुळे नेरळकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गेल्या तीन दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत आहे. सकाळ-सायंकाळ अशा दोन्ही वेळच्या पाणीपुरवठ्यात गाळयुक्त पाणी येत असल्याने उकळून आणि गाळून पाणी प्यायल्याशिवाय नागरिकांना पर्याय नाही. संतप्त नागरिकांनी नळातून येणाऱ्या गढूळ पाण्याचे व्हिडीओ आणि छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल करून प्रशासनाच्या बोगस कारभाराची पोलखोल केली आहे.
शिवसेनेने उठवला आवाज
गढूळ पाणी प्यावे लागत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत तक्रारी करूनही प्रशासन आणि लोकप्रतिनिधी कानाडोळा करत आहेत. याबाबत शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आवाज उठवला असून निवडून आलेले लोकप्रतिनिधी या गंभीर प्रश्नावर मूग गिळून गप्प का, असा सवाल नेरळ उपशहरप्रमुख संदीप उतेकर यांनी केला आहे.
































































