
आता आपण देशाकडे जंतर मंतर नंतरचा भारत या दृष्टीने पहायला पाहिजे. मोदी शहांनी गुंगी दिलेला झोपलेला हा भारत नाहिये. भारत खडबडून जागा झाला आहे, असे विधान शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केले आहे. तसेच जंतरमंतरवर पुन्हा आंदोलन होणार आहे, त्यामुळे काही लोक देश सोडून पळू जाऊ शकतात त्यांचे पासपोर्ट जप्त झाले पाहिजे अशी मागणीही संजय राऊत यांनी केली.
मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे या देशाचे खरे गुन्हेगार आहेत. त्यांच्या कार्यकाळात सर्वच क्षेत्रात हुकुमशाही पद्धतीने संविधानाची हत्या करू जे निर्णय घेण्यात आले, लोकभावना नष्ट करून जवळजवळ ही लोकशाहीची हत्या झाली. आणिबाणीच्या काळात याच भाजपने इंदिरा गांधींवर हेच आरोप केले होते. पण इंदिरा गांधी या लोकशाहीच्या सर्वात मोठ्या संरक्षक होत्या. त्यांनी निष्पक्षपणे निवडणुकी घेतल्या. इंदिरा गांधींना निवडणुकीत घोटाळे करून जिंकता आलं असतं, पण त्या आणि संजय गांधी हरले. पण भारताची लोकशाही ही जगातील प्रतिष्ठित लोकशाही आहे. या लोकशाहीच्या प्रक्रियेत घोटाळा केला तर जगात भारताची इभ्रत नष्ट होईल, ही सतत त्यांना चिंता होती. इंदिरा गांधी हरल्या आणि तुरुंगात गेल्या. त्यांच्यावरही शहा अभियोग चालवण्यात आला. यातून बाहेर पडून त्या निवडणुकीला सामोऱ्या गेल्या आणि निवडून सत्तेवर आल्या. मोदी शहा आणि त्यांच्या माफिया गँगने सर्व घटनात्मक यंत्रणांवर ताबा मिळवला. त्यात राष्ट्रपती, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, निवडणूक आयोग, केंद्रीय तपास यंत्रणा यांना आपलं गुलाम बनवून देशावर जी संकंट आणली. त्यामुळे राहुल गांधी यांनी मोदी शहांचा उल्लेख देशद्रोही असा केला तो योग्य आहे. २०२९ साली केंद्रीय सत्तेत फेरबदल होतील. कारण २०२४ ची निवडणूक कशाप्रकारे जिंकले हे आता उघड झाले आहे. २०२९ ला यांचा बाप जरी खाली उतरला तरी त्यांना अशा प्रकारची कृत्ये करता येणार नाही. या सगळ्यांच्या वरती खटले चालतील. यांचे सारे पुढील आयुष्य तुरुंगात जाईल किंवा कोर्टाच्या चकरा मारण्यात जाईल. अशा वेळी राहुल गांधी यांनी सांगितले की ज्ञानेश कुमार यांनी माफीचे साक्षीदार व्हा आणि तुम्हाला निवडणूक चोरण्याचे, मत चोरण्याचे कोणी आदेश दिले याचा खुलासा करा. ही राहुल गांधी यांनी मांडलेली भूमिका योग्य आहे. ज्ञानेश कुमारांवर महाभियोग चालवण्यासाठी आम्ही नोटीस देतच आहोत. यापूर्वीही साठ खासदारांनी सह्या करून आम्ही नोटीस दिली होती. पण राज्यसभेचे चेअरमन यांना मोदींनीच नेमले असल्याने त्यांनी कायदेशीर महाभियोगाचा प्रस्ताव फेटाळला होता. पण आता तो प्रस्ताव त्यांना फेटाळता येणार नाही. मुळात पुढल्या अधिवेशनात तरी मोदी शहा येतील का ही शंका आहे. जर पंतप्रधान आणि गृहमंत्री घाबरून संसदेत येणार नसतील तर संसदेला टाळं लावा. किंवा नव्याने निवडणुकीला सामोरं जा, असेही संजय राऊत म्हणाले.
आता आपण देशाकडे जंतर मंतर नंतरचा भारत या दृष्टीने पहायला पाहिजे. मोदी शहांनी गुंगी दिलेला झोपलेला हा भारत नाहिये. भारत खडबडून जागा झाला आहे. जंतर मंतर नंतर हे जगाने पाहिलेले आहे. त्यामुळे ही तरुण मुलं भगत सिंहप्रमाणे रस्त्यावर उतरायला, लढायला तयार आहेत. आम्ही सगळे त्यांच्यासोबत आहोत. आमची लढाई आधीपासून सुरूच होती पण आता कॉक्रोच जनता पार्टीचा नवीन झुरळांचा फोर्स आलेला आहे, तो या देशामध्ये कोणतेही गैरकृत्य करू देणार नाही. काल अभिजीत दिपके यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे, आणि त्यांनी त्याबाबत तयारी सुरु केली आहे. जंतर मंतर -२ हे जंतर मंतर -१ पेक्षा विशाल आंदोलन होईल. आणि हे देशभरात होईल असं आता मला वाटायला लागलं आहे. जंतर मंतरवरील आंदोनल हे तरुणाचं आंदोलन होतं आणि या आंदोलनाला हुकुमशाहीविरोधात लढणाऱ्या प्रत्येक राजकीय पक्षांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिला. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात कुठलाही पक्ष नव्हता किंवा झेंडा नव्हता. जंतरमंतरवर पुन्हा आंदोलन होणार आहे, त्यामुळे अनेक लोक देश सोडून पळू जाऊ शकतात,त्यामुळे त्यांचे पासपोर्ट जप्त झाले पाहिजे, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.



























































