दुष्काळ निवारण हा भाजपचा वैयक्तिक कार्यक्रम किंवा इव्हेंट नाही – संजय राऊत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्जमाफीची घोषणा होऊनही अनेक तालुक्यांत आणि गावांमध्ये एकही कर्जमाफीचा लाभार्थी सापडत नसेल तर कर्जमाफी नेमकी कुणाला मिळाली? असा सवाल शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला. तसेच दुष्काळ निवारण हा का भाजपचा वैयक्तिक कार्यक्रम किंवा वैयक्तित इव्हेंट नाही, असेही संजय राऊत म्हणाले.

मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, कर्जमाफीची घोषणा होऊनही अनेक तालुक्यांत आणि गावांमध्ये एकही कर्जमाफीचा लाभार्थी सापडत नसेल तर कर्जमाफी नेमकी कुणाला मिळाली? ही फक्त घोषणेपुरतीच होती का हे पहावं लागेल. मुख्यमंत्र्‍यांनी काही मनापासून गोष्टी कराव्यात. राजकारणापलीकडे जाऊन दुष्काळाकडे पहावं लागेल. आणि जर तुम्हाला महाराष्ट्राच्या दुष्काळाबाबत एवढी चिंता असेल तर राज्यातल्या प्रमुख नेत्यांशी चर्चा करावी. दुष्काळ निवारण हा का भाजपचा वैयक्तिक कार्यक्रम किंवा वैयक्तित इव्हेंट नाही. दुष्काळ हे राज्यावरचे संकट आहे. मुख्यमंत्र्यांनीसर्वपक्षीय बैठक बोलवावी, सर्व माजी मुख्यमंत्र्यांना बोलवा आणि त्यांच्या काळात या संकटाशी कसा सामना केला हे जाणून घ्या, असे संजय राऊत म्हणाले.

गणपती हा लोकशाहीचा प्रेरक होता. गणपती म्हणजे संघराज्य, अनेक गणांचा प्रमुख म्हणजे गणपती. हा देशसुद्धा गणराज्य आहे. पण गणराज्याची अवस्था हुकुमशाहीकडे चालली आहे. त्यामुळे गणपतीकडे आम्ही तेच साकडे घातलेले आहे की तुझ्या विसर्जनासोबत या देशाची हुकमशाहीही विसर्जित होऊ दे. आणि जे हुकुमशाहा आणि भ्रष्ट लोक आहेत यांचेही विसर्जन झाले की पुढल्या वर्षी अधिक उत्साहात गणपतीचे वाजतगाजत स्वागत करू, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.

राहुल गांधी दयावान आहे. देशहितासाठी त्यांनी ज्ञानेश कुमार यांना माफीचा साक्षीदार होण्यास सांगितले आहे. २०२९ साली या देशात नवीन सरकार येणार आहे. त्यावेळी ज्यांनी ज्यांनी देशासोबत बेईमानी केली आहे, त्यांच्याविरोधात खटले चालणार ते तुरुंगात जाणार. या लोकांना देशाची जनता रस्त्यावर पकडणार आणि चप्पल बुटांनी मारणार. देशाच्या गद्दारांना बुटांनीच मारलं पाहिजे. ही घोषणा भाजपची आहे. दिल्लीत अनुराग ठाकूर यांनीच ही घोषणा दिली होती. देश के गद्दारोंको जुते मारो सालो को असं ते म्हणाले होते. आता जे देशाचे गद्दार आहेत त्यांना बुटांनी मारणार आम्ही. जनता त्यांना पळवून पळवून मारेल, दिल्लीत जाऊन पहिलं बूट मीच मारणार. आम्ही त्यांना ना कधी घाबरलो ना पुढे कधी घाबरणार, असेही संजय राऊत यांनी यावेळी नमूद केले.