ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा! मुख्य निवडणूक आयुक्तांविरुद्धच्या आंदोलनात गौरव गोगोई यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी शुक्रवारी आसाममध्ये पुकारण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान आसाम काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गौरव गोगोई यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मतदार याद्यांच्या एसआयआर प्रक्रियेतील गैरव्यवहारावरून सध्या राजकीय वातावरण तापले असून, याच पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून हे आंदोलन करण्यात आले.

‘ज्ञानेश कुमार यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा’

आंदोलनादरम्यान ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना गौरव गोगोई यांनी निवडणूक आयोगाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले. ते म्हणाले, “ज्ञानेश कुमार यांनी गुन्हा आणि देशद्रोह केला आहे. त्यांनी आजच्या आज राजीनामा द्यावा आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करत त्यांना अटक करावी.”

गोगोई यांनी या मुद्द्यावरून केंद्र सरकारवरही जोरदार निशाणा साधला. “ज्ञानेश कुमार यांच्या पाठीशी त्यांचे सूत्रधार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा उभे आहेत, हे देशातील जनता कधीही विसरणार नाही आणि देश त्यांना माफ करणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला.

नागरिकांच्या मतदानाच्या मूलभूत अधिकाराचा हा मुद्दा असल्याचे सांगत गोगोई म्हणाले की, “हिंदुस्थानात लोकशाही जिवंत आहे, कारण इथे निष्पक्ष निवडणुका होतात. आज निवडणूक आयोगाचे एकच काम आहे, ते म्हणजे मतदार यादी सुरक्षित ठेवणे. पण ते हे काम करत नसून त्यांनी थेट लोकशाहीवरच हल्ला केला आहे.”