
मराठवाड्यात दुष्काळाची भीषणता दिवसेंदिवस अधिकच गडद होत असून पावसाअभावी डोळ्यांदेखत जळणारी पिकं आणि कर्जाचा डोंगर या दुहेरी संकटाने आणखी एका तरुण शेतकऱ्याचा बळी घेतला आहे. लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्यातील डोंगरगाव (बोरी) येथील 33 वर्षांच्या अंकुश रमेश काळे या अल्पभूधारक शेतकऱ्याने शेतात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून सर्वत्र सुन्न करणारे वातावरण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंकुश काळे यांच्याकडे अवघी दोन एकर शेती होती. केवळ दोन एकरच्या उत्पन्नावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अशक्य असल्याने, ते स्वतःच्या शेतीसोबतच गावात इतर शेतकऱ्यांच्या शेतात सालगडी म्हणून मजुरीचे काम करत होते. त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती.
शेतीसाठी त्यांनी लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून 40 हजार रुपये आणि स्टेट बँक ऑफ इंडियाकडून 1 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. यंदा पावसाने पूर्णपणे पाठ फिरवल्यामुळे शेतातील उभं पीक डोळ्यांदेखत करपून गेलं. पीक जळून खाक झाले तर बँकेचे कर्ज कसे फेडायचे आणि कुटुंबाचा गाडा कसा हाकायचा? याच विवंचनेत आणि नापिकीच्या नैराश्यातून त्यांनी हे अत्यंत टोकाचे पाऊल उचलले.
अंकुश यांनी स्वतःच्याच शेतात गळफास लावून आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. ऐन उभारीच्या वयात तरुण कर्त्या पुरुषाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने काळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.































































