दखल – अनवट वाटेवरच्या पाऊलखुणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रा. शाम जोगळेकर

‘माझ्या पाऊलखुणा’ हे मंगल गोगटे यांचे पुस्तक अनघा प्रकाशनने प्रकाशित केले आहे. या पुस्तकाला अमोल मोरे यांची वेधक प्रस्तावना आहे. त्यांच्या मते, प्रत्येक प्रवाशाचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. काही जण देश पाहतात, काही निसर्ग पाहतात, काही इतिहास शोधतात; पण मंगल गोगटे या प्रवास करताना माणसे, संस्कृती, परंपरा, निसर्ग, इतिहास आणि त्या सर्वांच्या मागे असलेले भावविश्व पाहतात. ‘मनोगत’मध्ये मंगल यांनी आपल्या देश, विदेशातील प्रवासाविषयीची आवड निवड स्पष्ट केली आहे. एकटय़ाने प्रवास करण्याची त्यांची आवड जाणवते.

‘परिकथेतील किल्ला’ या पहिल्या लेखात लिथुएनिया या दहा वर्षांपूर्वी स्वतंत्र झालेल्या देशातील त्राकाय या गावातील एका किल्ल्याचे सविस्तर वर्णन वाचावयास मिळते. ‘समुद्री सोनं’ या लेखात अॅंबर या समुद्रात तयार होणाऱया सोन्याची माहिती वाचावयास मिळते.

‘पॅरिसची संध्याकाळ’ आणि ‘दोन टॉवर्सची गोष्ट’ हे लेख पॅरिस शहराशी निगडित आहेत. सुमारे बारा देश पाहिल्यानंतर लेखिकेचे पॅरिसला जाणे झाले. फ्रेंच भाषा येत नसतानाही विविध ठिकाणी भेटलेल्या परिचित आणि अपरिचित व्यक्तींमुळे प्रवास सुलभ झाल्याचे वाचकाला समजते. सिमल्यातील वुडविल पॅलेसचे सविस्तर वर्णन एका लेखात लेखिकेने केले आहे. हा पॅलेस चित्रपट तारे, विचारवंत, लेखक, पर्यटक साऱयांनाच आवडणारा आहे. फ्रान्समधील मुलूझ या शहराचे वैशिष्टय़ म्हणजे तेथील विविध संग्रहालये. तेथील मोटारगाडय़ा आणि ट्रेन्स यांची संग्रहालये. युरोपातील सगळ्यात मोठी ही संग्रहालये आहेत. मोटारगाडय़ांचे येथील संग्रहालय जगातील सर्वात मोठे समजले जाते.

मंगोलिया या देशाला लेखिकेला भेट देण्याची संधी मिळाली. तेथील लोकांशी संपर्क साधून तेथील समाज जीवनाची माहितीही लेखिकेला प्राप्त झाली. त्यानंतरच्या लेखातून मंगोलियन संस्कृती कशी कात टाकते आहे, याविषयी लेखिकेने तेथील युवकांच्या दृष्टिकोनाविषयी विशेष माहिती दिली आहे. तेथील युवक पाश्चात्त्य देशांमध्ये जाऊन, उच्च शिक्षण घेऊन आपल्या देशात कमी उत्पन्न मिळत असले तरीही परत येण्याला महत्त्व देतात, याचे लेखिकेप्रमाणेच वाचकालाही आश्चर्य वाटते. ‘मायदेशवेडे विद्यार्थी’ या लेखांमध्ये हे सविस्तरपणे मांडले आहे.

‘लक्ष लक्ष दिव्यांची पाचूची बेटं’ आणि ‘प्रवाळांच्या कोंदणातलं बेट’ या दोन लेखांतून लेखिकेने लक्षद्वीप बेटांच्या समूहाकडे सर्वसामान्य प्रवाशांकडून होणाऱया दुर्लक्षाकडे लक्ष वेधले आहे. तेथील प्रेक्षणीय स्थळांबरोबरच त्या भागातील समाज जीवनाचे विवेचन केले आहे. ‘द ग्रेट वॉल ऑफ इंडिया’ या लेखात कुंभलगड या उदयपूरजवळच्या ठिकाणाची लेखिकेने ओळख करून दिली आहे.

‘ईगल नेस्ट ः एका गरुडाचं घरटं’ या लेखामध्ये हिटलर आणि त्याचे सहकारी यांच्या महत्त्वाच्या गुप्त बैठका जेथे होत, त्या ठिकाणाला भेट देण्याची संधी लेखिकेला मिळाल्यामुळे तेथील अप्रतिम प्रवास वर्णनाचा लाभ वाचकांनाही प्राप्त होतो. दुसऱया महायुद्धाचा निर्णय या ठिकाणीच हिटलरने घेतला होता. या युद्धात एकूण 620 लाख लोक मृत्यू पावले होते. ‘फुलांचे गालिचे’ या लेखात लेखिकेने कास पठाराला दिलेल्या भेटीचे आणि तेथील विविध रंगांच्या फुलांच्या दर्शनाचे वर्णन केले आहे. कास पठारावरील फुलांमध्ये लेखिकेला जणू ईश्वराचे रूपच पाहायला मिळाले. एकटीने प्रवास करताना लेखिकेला देश-विदेशातील अनेकांची मदत झाली. त्याबद्दल ‘मदतीचे हात’ या लेखात मंगल यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.

 ‘माझ्या पाऊलखुणा’ या पुस्तकाच्या वाचनामुळे लेखिकेचे विविध जीवनानुभव समजतात. शेवटी मंगल यांचा सचित्र परिचय दिला आहे. पुस्तकातील काही सदोष शब्द खटकतात. पुस्तक नितांत वाचनीय आणि संग्राह्य आहे.

माझ्या पाऊलखुणा 

लेखिका : मंगल गोगटे 

प्रकाशक : अनघा प्रकाशन, ठाणे

पृष्ठे : 157

किंमत : रु.300/-