
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या… गणपती निघाले गावाला, चैन पडेना आम्हाला… अशा गगनभेदी घोषणा, ढोल-ताशांचा गजर आणि तरुणाईचा अमाप उत्साह अशा वातावारणामध्ये मुंबईत गणरायाला निरोप देण्यात आला. एकीकडे गणपती विसर्जनाची मिरवणूक सुरू असताना दुसरीकडे प्रभादेवी भागामध्ये एक भीषण अपघात झाला. काकासाहेब गाडगीळ मार्गावरील इंद्र टॉवरजवळ ‘के. जी. मार्गचा राजा’ या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत एका भरधाव होंडा सिटी कार घुसली आणि भाविकांना धडक दिली. या अपघातात चार जण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री ही घटना घडली. ‘के. जी. मार्गचा राजा’ची विसर्जन मिरवणूक सुरू असताना होंडा सिटी (एमएच 01 एफडी 7147) कार मिरवणुकीमध्ये घुसली. या अपघातात चार भाविक किरकोळ जखमी झाले आहेत. पोलिसांनी बेदरकारपणे कार चालवणाऱ्या प्रणव राकेश अगरवाल (वय – 21) याला ताब्यात घेतले आहे. अपघाताच्या वेळी चालक नशेत होता का, याची शहानिशा करण्यासाठी त्याला वैद्यकीय तपासणीकरिता सायन रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
दरम्यान, अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. स्थानिक नागरिक व पोलिसांनी तत्परता दाखवत जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. जखमींपैकी दोन जणांना उपचारासाठी के.ई.एम. रुग्णालयात पाठवण्यात आले, तर उर्वरित दोन जखमींवर जवळच्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मुंबई छ प्रभादेवीत ‘KG मार्गचा राजा’च्या विसर्जन मिरवणुकीत कार घुसली, चालक ताब्यात pic.twitter.com/y2OKag2T58
— VIRALबाबा (@viralmedia70) September 25, 2026
गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
घटना घडल्यानंतर पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या घटनास्थळी पूर्णपणे शांतता असून कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झालेला नाही,.पोलीस सध्या सर्व जखमींचे सविस्तर जबाब नोंदवून घेत असून, निष्काळजीपणे व बेदरकारपणे वाहन चालवून अपघात केल्याप्रकरणी चालकाविरुद्ध एफआयआर नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती पोलीस उपआयुक्त महेंद्र पंडित यांनी दिली. पोलीस या प्रकरणाचा पुढील अधिक तपास करत आहेत.

























































