
कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वेगाने होत असलेला विकास जितका आशादायक आहे, तितकेच त्याच्या संभाव्य धोक्यांबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी एआयच्या गैरवापराबाबत गंभीर इशारा दिला आहे. शक्तिशाली एआय तंत्रज्ञानाचा वापर चुकीच्या व्यक्तींकडून झाल्यास एक अब्ज लोकांचा मृत्यू होऊ शकतो, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. मात्र, हा निश्चित मृत्यूंचा अंदाज नसून एआयच्या संभाव्य धोक्यांबाबत व्यक्त केलेली चिंता आहे.
अमेरिकेतील एनबीसीच्या ‘मीट द प्रेस’ या कार्यक्रमात पत्रकार क्रिस्टन वेल्कर यांच्याशी संवाद साधताना गेट्स यांनी एआयच्या क्षमतेबाबत भाष्य केले. एआय संपूर्ण मानवजातीला नष्ट करण्याइतके शक्तिशाली ठरू शकते का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी एआयमुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होऊ शकते, असे सांगितले. गेट्स यांच्या मते, एआयचा धोका केवळ यंत्रमानव माणसांच्या विरोधात जाण्यापुरता मर्यादित नाही. उलट, माणसेच विध्वंसक हेतूंसाठी या तंत्रज्ञानाचा वापर करू शकतात, ही अधिक गंभीर चिंता आहे असे वृत्त आज तक ने दिले आहे.
एआयच्या मदतीने सायबर हल्ले अधिक व्यापक स्वरूपात केले जाऊ शकतात. रुग्णालये, वीजपुरवठा व्यवस्था आणि इतर अत्यावश्यक सेवांमध्ये व्यत्यय आणण्यासाठी या तंत्रज्ञानाचा गैरवापर होण्याची शक्यता आहे. याशिवाय जैविक दहशतवादासाठी एआयचा वापर होण्याचा धोकाही त्यांनी अधोरेखित केला.
एआयच्या संभाव्य धोक्यांबाबत केवळ गेट्सच नव्हे, तर तंत्रज्ञान क्षेत्रातील इतर दिग्गजही चिंता व्यक्त करत आहेत. अँथ्रोपिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी डारिओ अमोदेई यांनीही सायबर हल्ले आणि जैविक दहशतवादासाठी एआयचा गैरवापर होण्याच्या शक्यतेवर भाष्य केले आहे. गेट्स यांच्या मते, एआय कंपन्यांनी स्वतःसाठी नियम तयार करणे पुरेसे नाही. सरकार, कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्था आणि धोरणकर्त्यांनीही या तंत्रज्ञानाच्या वापरावर देखरेख ठेवण्यासाठी आवश्यक नियम तयार करणे गरजेचे आहे.
एआयमुळे निर्माण होणारा धोका हा केवळ तंत्रज्ञानाचा नसून, त्याचा वापर करणाऱ्या माणसांचाही आहे. एआयचा विकास सुरू ठेवतानाच त्याच्या गैरवापराला आळा घालण्यासाठी योग्य सुरक्षा व्यवस्था आणि नियम तयार करणे आवश्यक असल्याचा मुद्दा गेट्स यांच्या विधानातून पुढे आला आहे.





















































