तरुण वयातच बिघडतंय हृदयाचं आरोग्य? किचनमधील या पदार्थांचा अतिवापर ठरू शकतो घातक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवायचे असेल तर, आपल्याला आपल्या दैनंदिन सवयींकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. आपल्या स्वयंपाकघरात अशा गोष्टी आहेत, ज्यांचा अतिवापर केल्यास हृदयाला गंभीर नुकसान पोहचू शकते. त्यामुळे या गोष्टींकडे वेळेवर लक्ष देणे आवश्यक आहे. आजकालच्या काळात तरुण वयातही लोकांना हृदयाशी संबंधित आजार होऊ लागले आहेत. आपले आरोग्य आणि खानपानाच्या चुकीच्या सवयींचा थेट परिणाम हृदयावर होतो. जाणून घ्या अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यांच्या अतिवापराणे हृदयावर परिणाम होण्याची शक्यता असते.

मीठ
जेवणात मीठ नसले की ते अळणी आणि बेचव लागते, परंतु जास्त प्रमाणात मिठाचे सेवन केल्यास रक्तदाब वाढू शकतो. रक्तदाब वाढल्यामुळे हृदयावर अतिरिक्त ताण पडतो, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढण्याची शक्याता असते.

साखर
अतिरिक्त साखरेचे सेवन केल्याने वजन वाढणे, लठ्ठपणा आणि शुगर होण्याचा धोका वाढतो. हे सर्व घटक पुढे जाऊन हृदयविकाराचे मुख्य कारण ठरू शकतात.

रिफाइंड तेल
आजकाल तिखट-मीठ किंवा तळलेले पदार्थ बनवण्यासाठी रिफाइंड तेलाचा वापर भरपूर प्रमाणात केला जातो. रिफाइंड तेलाचा गरजेपेक्षा जास्त वापर आहारामध्ये केल्याने अतीरिक्त चरबी वाढते. जी आपल्या हृदयासाठी अजिबात योग्य मानली जात नाही.

मैदा
मैद्यापासून बनवलेले पदार्थ जसे की बिस्किटे, पास्ता, पिझ्झा आणि ब्रेड आजकाल आरोग्याचे शत्रू बनत चालले आहेत. मैद्याचे सतत आणि जास्त सेवन संतुलित आहाराचा भाग नाही. यामुळे पचनसंस्थेवर वाईट परिणाम होतोच, पण हृदयालाही हानी पोहोचते.

प्लास्टिकचे डबे/कंटेनरचा वापर
खाण्यापिण्याच्या वस्तूंव्यतिरिक्त किचनमध्ये वापरले जाणारे प्लास्टिकचे कंटेनर देखील हृदयासाठी हानिकारक ठरू शकतात. गरम अन्न दीर्घकाळ प्लास्टिकच्या डब्यात ठेवल्यामुळे त्यातील हानिकारक रसायने अन्नात मिसळतात. त्यामुळे काच किंवा सुरक्षित पर्यायांचा वापर करावा.

  • हृदय निरोगी ठेवण्यासाठी रोजच्या जेवणात मीठ, साखर आणि तेलाचे प्रमाण नियंत्रित ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. यासोबतच ताजे आणि पौष्टिक अन्न खाण्याला प्राधान्य दिले पाहिजे. खाण्यापीण्याच्या सवयी बदलण्यासोबतच दररोज नियमित शारीरिक व्यायाम करणे ही हृदयाच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे.