मंगळुरूत ऑइल रिफायनरीत भीषण स्फोट; आजूबाजूच्या इमारती हादरल्या, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्नाटकातील मंगळुरू येथे बुधवारी दुपारी ऑइल रिफायनरीत झालेल्या भीषण स्फोटाने परिसर अक्षरशः हादरून गेला. जोकट्टे परिसरातील मंगळुरू रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड (MRPL)च्या तिसऱ्या युनिटमध्ये हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. स्फोटाचा आवाज आणि हादरे इतके तीव्र होते की, आसपासच्या नागरिकांना काही क्षणांसाठी भूकंप झाल्याचा भास झाला. स्फोटानंतर रिफायनरी परिसरातून आगीच्या मोठ्या ज्वाला आणि काळ्या धुराचे लोट आकाशात पसरले. या धुराचे लोट अनेक किलोमीटर अंतरावरूनही दिसत होते. स्फोटाचा मोठा आवाज जोकट्टे, बाजपे, कलावरू, बैकामपाडी, सुरथकल आणि कटीपल्ला परिसरापर्यंत ऐकू गेला.

स्फोटाच्या तीव्र धक्क्यामुळे आसपासच्या अनेक घरांच्या खिडक्या आणि दरवाजांच्या काचा फुटल्या. जोकट्टे ग्रामपंचायत कार्यालयाच्या खिडक्यांचे तावदानही चकनाचूर झाले. काही घरांच्या आणि इमारतींच्या भिंतींना तडे गेल्याची माहिती स्थानिकांकडून देण्यात आली आहे. अचानक झालेल्या या स्फोटामुळे परिसरात मोठी घबराट पसरली. हादरे जाणवताच अनेक नागरिक घराबाहेर पडून मोकळ्या जागेत जमा झाले. ग्रामपंचायत कार्यालयाबाहेरही नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच मंगळुरू, पांडेश्वर आणि आसपासच्या भागांतून अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग नियंत्रणात आणण्यासाठी आणि परिस्थिती हाताळण्यासाठी बचाव पथकांकडून प्रयत्न सुरू आहेत. स्फोट नेमका कशामुळे झाला, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली आहे का आणि किती नुकसान झाले, याबाबत MRPL प्रशासनाकडून अधिकृत माहिती मिळालेली नाही.