
राजापूर तालुक्यातील मूर-तांबळवाडी येथील ग्रामस्थांनी सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकत वाडीमध्ये पूर्वापार चालत आलेली विधवा प्रथा बंद करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. पतीच्या निधनानंतर विधवा महिलेचे अलंकार उतरवणे, कुंकू पुसणे आदी प्रथा यापुढे पाळल्या जाणार नाहीत, असा ठराव ग्रामस्थांच्या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला.
पतीच्या निधनाचे दुःख पचवत असलेल्या महिलेवर त्याच वेळी तिच्या सौभाग्याच्या खुणा काढून घेण्याची प्रक्रिया केली जाते. त्यामुळे संबंधित महिलेला मानसिक वेदनेतून जावे लागते. ही प्रथा काळानुरूप बदलण्याची गरज लक्षात घेऊन मूर-तांबळवाडी ग्रामस्थांनी ती कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला. मुंबई मंडळाचे अध्यक्ष प्रकाश बारगोडे, प्रकाश यद्रुक, सचिव विलास पवार, तसेच विजय बने, राजेश बने, विजय पवार, रघुनाथ गुंडये यांच्यासह मुंबई मंडळाचे पदाधिकारी आणि स्थानिक ग्रामस्थांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
यावेळी ग्रामस्थांनी सांगितले की, “काळानुसार सामाजिक प्रथांमध्ये बदल होणे ही गरज आहे. ज्या प्रथांमुळे महिलांना अनावश्यक मानसिक वेदना सहन कराव्या लागतात, त्या प्रथा समाजाने सामूहिकपणे पुढाकार घेऊन बंद केल्या पाहिजेत. प्रत्येक ग्रामपंचायत आणि गावाने अशा परिवर्तनशील निर्णयांकडे वाटचाल करणे आवश्यक आहे. यातून स्त्री सन्मान आणि स्त्री सक्षमीकरणाला अधिक बळ मिळेल.”मूर-तांबळवाडी ग्रामस्थांनी घेतलेल्या या निर्णयातून सामाजिक सुधारणेची नवी दिशा निर्माण झाली असून, परिसरातून या पुरोगामी भूमिकेचे स्वागत केले जात आहे.
























































