
महापालिकेतर्फे मुंबई डिजिहेल्थ कनेक्ट (एमडीसी) अभियान 100 दिवस राबविण्यात येणार आहे. हे अभियान 2 ऑक्टोबर 2026 पासून होईल. अभियानांतर्गत मुंबईतील अधिकाधिक पात्र नागरिकांचे आयुष्मान भारत हेल्थ अकाऊंट (आभा) कार्ड निर्माण करण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यासोबतच 70 हून अधिक वयोमान असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे आयुष्मान वय वंदना कार्ड तयार केले जाणार आहे. आभा कार्डमुळे नागरिकांचे वैद्यकीय रेकॉर्ड डिजिटल स्वरूपात एकाच ठिकाणी सुरक्षित ठेवले जातील. त्या अनुषंगाने नागरिकांना उपचार उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
शिधावाटप केंद्रावर पीएमजेएवाय/एमजेपीजेएवाय कार्ड नोंदणी
मुंबईतील प्रधानमंत्री जनआरोग्य योजना (PMJAY) / महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना (MJPJAY) कार्ड आता पात्र लाभार्थ्यांना शिधावाटप दुकानांवर तयार करून मिळेल. आरोग्य स्वयंसेविका शिधावाटप दुकानांवर येणाऱ्या पात्र शिधापत्रधारकांची ओळख पटवून रेशनकार्ड / ई-केवायसी आधारे पात्रता पडताळणी करतील.
तीन टप्प्यांमध्ये मोहीम
पहिल्या टप्प्यात जनजागृती मोहीम, अधिकारी-कर्मचारी व स्वयंसेवकांचे प्रशिक्षण आणि स्वयंसेवक नोंदणी करण्यात येईल. तसेच प्रचार साहित्याचे वितरण करण्यात येईल.
दुसऱ्या टप्प्यात रुग्णालये, दवाखाने, आपला दवाखाना, प्रसूतिगृहे, प्रशासकीय विभाग कार्यालये, शाळा-महाविद्यालये, गृहनिर्माण संस्था, झोपडपट्टी वस्त्या, बाजारपेठा आणि शिधावाटप केंद्र येथे मोठ्या प्रमाणात नोंदणी करण्यात येईल. महानगरपालिका मुख्यालय, विभागीय आणि प्रशासकीय कार्यालये येथे अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी विशेष आभा नोंदणी शिबिरे आयोजित करण्यात येतील.
तिसरा टप्प्यात ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि वंचित घटकांसाठी घरपोच / विशेष जनसंपर्क मोहीम आयोजित करण्यात येईल. तसेच आभा नोंदणी शिबिरे आयोजित करण्यात येतील.



























































