
एअर इंडियामधील कर्मचाऱ्यांच्या सुविधांसाठी निर्माण झालेल्या एअर कॉर्पोरेशन एम्प्लॉईज बँकेला (एसीई को-ऑप बँक) २०२५-२६ या वर्षासाठी पगारदार बँक श्रेणीत सर्वोत्कृष्ट बँकेचा पुरस्कार मिळाला. बृहन्मुंबई नागरी सहकारी बँक्स असोसिएशनच्या माध्यमातून हा पुरस्कार प्रदान करण्यात आल्यामुळे बँकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
बृहन्मुंबई नागरी सहकारी बँक्स असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. या सोहळ्यात एसीई बँकेला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी बँकेच्या संचालक राजश्री पाटील, संदीप जाधव, ऋषिकेश बांडुक, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा पटेल, अध्यक्ष राजेश भागवत, उपाध्यक्ष नीलेश लांजेकर, बँकेचे संचालक संतोष मोरे, उमेश सानप, माजी सीईओ दिलीप कान्हेरे, सुचित्रा म्हात्रे, राजेंद्र पारकर आदी उपस्थित होते. एसीई बँकेला मिळालेला हा पुरस्कार बँकेच्या कार्यपद्धतीतील सातत्य, प्रगती आणि सामूहिक प्रयत्नांची दखल आहे. बँकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या योगदानामुळे हे साध्य झाल्याचे बँकेचे अध्यक्ष भागवत म्हणाले.
एसीई को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेच्या पॅनेलचे वर्चस्व असल्याचा उल्लेख करत बँकेचे अध्यक्ष राजेश भागवत म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार तसेच स्थानीय लोकाधिकार समितीचे अध्यक्ष शिवसेना नेते-खासदार अनिल देसाई आणि सरचिटणीस प्रदीप मयेकर यांच्या मार्गदर्शनाखाली एअर इंडिया स्थानिक लोकाधिकार समितीच्या माध्यमातून एसीई बँकेद्वारे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.























































