
कठोर मेहनत, चिकाटी, तितकाच संयम आणि महिला असल्याचा अजिबात आव न आणता प्रत्येक गुन्ह्याच्या खोलात जाऊन तपास करण्याबरोबरच गुन्हेगारांना शिक्षा मिळवून देणाऱ्या साहाय्यक पोलीस आयुक्त ज्योत्स्ना रासम बुधवारी पोलीस दलातून निवृत्त झाल्या. विश्वासू अधिकारी म्हणून रासम यांचा पोलीस दलात नावलौकिक होता.
वयाच्या २० व्या वर्षी एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होत ज्योत्स्ना रासम या पोलीस दलात दाखल झाल्या. १९८९ बॅचच्या सर्वात तरुण अधिकारी अशी त्यांची ओळख होती. पोलीस ठाणे व गुन्हे शाखेत त्यांनी महिला अधिकारी म्हणून उत्कृष्ट कामगिरी बजावली. तेलगी स्टॅम्प पेपर घोटाळा, लैला खान हत्याकांड, ‘२६/११’, साकीनाका बलात्कार व हत्या यांसारख्या क्लिष्ट व महत्त्वाच्या गुन्ह्यांत ज्योत्स्ना रासम यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. साकीनाका प्रकरणात तर युद्धपातळीवर तपास करत अवघ्या १८ दिवसांत आरोपपत्र दाखल केले. त्या गुन्ह्यात त्यांनी सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे आरोपीला शिक्षादेखील झाली. म्हणून शासनाने रासम यांच्या अतुलनीय कामांची दखल घेत त्यांना राष्ट्रपती पदकासह अन्य पदकांनी वेळोवेळी सन्मानित केले आहे. ३७ वर्षे चार महिने इतकी त्यांनी सेवा बजावली. खाकीची शान वाढविणाऱ्या रासम यांनी स्त्रीभ्रूणहत्येविरोधातही जनजागृतीचे काम केले, शिवाय अनेकदा गिर्यारोहणदेखील केले आहे.

























































