
दिवसेंदिवस वाढणाऱया महागाईने सर्वसामान्य नागरिकांना बेजार केले आहे. व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरवाढीनंतर मुंबई महानगर क्षेत्रात सीएनजीच्या दरात प्रतिकिलो 1 रुपयाची वाढ करण्यात आली आहे. बुधवारी मध्यरात्रीपासून ही दरवाढ लागू केली. त्यामुळे सीएनजीचा प्रतिकिलो दर 89 रुपयांवर गेला आहे. लागोपाठ महागाईचे चटके बसू लागल्याने मोदी सरकारचे ‘अच्छे दिन’ हेच का? असा सवाल नागरिक विचारत आहेत.
यापूर्वी 1 सप्टेंबर रोजी सीएनजीची प्रतिकिलो दोन रुपयांची दरवाढ केली होती. त्याला महिना उलटत नाही तोच महानगर गॅस लिमिटेडकडून आणखी 1 रुपयाची दरवाढ जाहीर करण्यात आली. गॅसच्या इनपूट खर्चात वाढ झाल्याचे कारण महानगर गॅस लिमिटेडने दिले आहे. सलग दुसऱया महिन्यात केलेल्या या दरवाढीचा मोठा भुर्दंड वाहनचालकांना सोसावा लागणार आहे.



























































