Ratnagiri News – मुंबई-गोवा महामार्गाच्या कामामुळे माभळे परिसरातील जोडरस्ते खड्ड्यात, संगमेश्वर शहर व गावांना जोडणाऱ्या रस्त्यांचे काम कधी?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम संगमेश्वर तालुक्यात सुरू असताना महामार्गाला संगमेश्वर शहरासह विविध गावांना जोडणाऱ्या जोडरस्त्यांची मात्र मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. विशेषतः माभळे परिसरातील जोडरस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले असून, वाहनचालक व प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. खडी टाकून तात्पुरत्या स्वरूपात रस्ते तयार करण्याचा प्रयत्न ठेकेदार कंपनीकडून केला जात असला, तरी कायमस्वरूपी रस्त्याचे काम कधी होणार, असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
महामार्गाच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात माती, खडी व इतर साहित्याची वाहतूक होत असल्याने गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस खराब होत आहे. अनेक ठिकाणी खड्डे निर्माण झाल्याने दुचाकीस्वार तसेच चारचाकी वाहनचालकांना वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. या रस्त्यांवर अपघाताच्या घटनाही घडत असून, तरीही संबंधित ठेकेदार कंपनीकडून आवश्यक ती दुरुस्ती केली जात नसल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
ग्रामस्थांनी रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत आवाज उठवून आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर ठेकेदार कंपनीकडून काही ठिकाणी खडी टाकण्यात आली. मात्र खडी टाकून रस्ता तयार करण्याचा प्रयत्न हा केवळ तात्पुरती मलमपट्टी ठरत असल्याची ग्रामस्थांची भावना आहे. पावसामुळे तसेच अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे हे रस्ते पुन्हा खराब होत असल्याने कायमस्वरूपी डांबरीकरणाची मागणी करण्यात येत आहे. माभळे येथील स्मशानभूमी तसेच गणेश विसर्जन घाटाचीही महामार्गाच्या कामामुळे दुरवस्था झाली आहे. या ठिकाणी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत ग्रामस्थांकडून वारंवार मागणी केली जात आहे. मात्र अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. स्मशानभूमी व विसर्जन घाटाची दुरुस्ती नेमकी कधी होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
महामार्गाच्या कामादरम्यान माभळे परिसरातील शेतकऱ्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत असल्याची तक्रार आहे. शेतीकडे जाणारे मार्ग, पाण्याचा निचरा आणि वाहतुकीच्या अडचणींमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे संबंधित नुकसानाची पाहणी करून योग्य ती भरपाई आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी होत आहे.महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीने केवळ खडी टाकून रस्ते तयार करण्याऐवजी जोडरस्ते, स्मशानभूमी, विसर्जन घाट तसेच शेतकऱ्यांच्या समस्यांवर कायमस्वरूपी उपाय करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. प्रत्येक काम कधी सुरू होणार आणि कधी पूर्ण होणार, याचे वेळापत्रक संबंधित कंपनीने जाहीर करावे, अशी मागणीही पुढे आली आहे.
ग्रामस्थांनी यापूर्वी आंदोलनाचा इशारा देऊनही ठेकेदार कंपनीकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे लवकरात लवकर या समस्यांची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.