जे सरकार शुद्ध पद्धतीने निवडणुका घेऊ शकत नाही, ते स्पर्धा परीक्षा काय घेणार, MPSC चं शुद्धीकरण व्हावं, ही विद्यार्थ्यांची मागणी – संजय राऊत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जे सरकार शुद्ध पद्धतीने निवडणुका घेऊ शकत नाही, ते स्पर्धा परीक्षा काय घेणार, अशी टीका शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सरकारवर केली आहे. पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाला राऊत यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ही टीका केली आहे.

यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, “हे सरकार जर तरुणांचं ऐकणार नसेल, तर कोणाचं ऐकणार? तुमच्यामध्ये ऊर्जा आहे, ताकद आहे, या महाराष्ट्रात आणि देशात तुम्हाला जे हवं आहे, ते घडवून आणण्याची. देशात आणि महाराष्ट्रात आज केंद्रबिंदू तुमच्यासारखा तरुण वर्ग आहे. आता सरकार काय करतंय? त्यांनी तुमच्या आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे जर हे सरकार खरोखर मनाने पवित्र असतं, तर त्यांनी अशी फूट पाडली नसती. त्यांनी तुमच्याशी आणि रोहित पवार यांच्याशी चर्चा केली असती, मागण्या समजून घेतल्या असत्या. आणि मागणी काय आहे? तर, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं संपूर्ण शुद्धीकरण करणं. शुद्धीकरण हा शब्द रोहित पवार यांचा आहे. देवेंद्र फडणवीस म्हणतात की आम्ही सगळ्या मागण्या मान्य केल्या आहेत, मग मुलं आंदोलनाला का बसली आहेत? जे केंद्र सरकार किंवा कोणतेही सरकार शुद्ध आणि पवित्र पद्धतीने निवडणुका घेऊ शकत नाही, ते स्पर्धा परीक्षा काय घेणार? जे सरकार निवडणुकांमध्ये भ्रष्टाचार, घोटाळा आणि भेसळ करत आहे.. तिथे ज्ञानेश कुमार बसले आहेत, इथे अजून कोणी बसलं आहे. मी तुम्हाला सांगतो, ज्ञानेश कुमार जाणार. हा आत्मविश्वास पाहिजे. हा आत्मविश्वास जोपर्यंत तुमच्या मनामध्ये आहे, तोपर्यंत यापुढे कोणताही चुकीचा माणूस महत्त्वाच्या पदावर बसवला जाणार नाही.”

सरकारवर टीका करत ते म्हणाले की, “तुम्ही (सरकार) या राज्याच्या प्रशासनामध्ये निर्माण होणाऱ्या एका पिढीला बरबाद करायला निघालेलात, हे पाप तुम्ही कुठे फेडाल? मुलांच्या स्पर्धा परीक्षांमध्ये घोटाळे, परीक्षांमध्ये घोटाळे, पेपर फुटतायत, नोकर भरतीमध्ये लोकसभा आयोगाचा घोटाळा… स्वतःच्या विचारांची माणसे प्रशासनात घुसवायची आणि अख्खं राज्य व्हाईट कॉलर माफियांच्या हातात द्यायचं, असा सरकारचा डाव आहे.”

तरुणांना शिक्षणापासून आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीपासून दूर नेऊन त्यांना अंधभक्त बनवण्याचा कारखाना सरकारने काढला आहे, अशी टीका त्यांनी केली. यावेळी राऊत यांनी जंतरमंतरवरील एका घोषणेचा उल्लेख केला, “बाप की चड्डी फटी हुई है, घर मे चुल्हा जलता नही है और बेटा मोदी मोदी करता है.” या देशाची हीच परिस्थिती आहे. आपल्यासारख्या तरुणांची डोके खराब करून, शिक्षणापासून दूर करून, विचार आणि संस्कृतीपासून महाराष्ट्राच्या दूर करून तुम्हाला अंधभक्त बनवण्याचा कारखाना या सरकारने चालवलेला आहे. आणि हा अंधभक्तीचा गांजा आणि चरस हातात उतरवायचं काम आम्ही सगळ्यांनी सुरू केलेलं आहे.”, असं ते म्हणाले.

आमदार आदित्य ठाकरे हे आजारी असल्याने येऊ शकले नाहीत, मात्र त्यांनी विद्यार्थ्यांसाठी निरोप दिल्याचे राऊत यांनी सांगितले. “तरुण मुलांच्या मागे आदित्य ठाकरे आणि त्यांच्या मागे आम्ही खंबीरपणे उभे आहोत. आमच्यासारखे ज्यांना सरकार म्हणतो, हे गुंड आहेत, आम्ही आहोत ना. तुम्हाला सरळ करण्यासाठी! तुम्ही आमच्याशी सामना करू शकत नाही. आम्हाला तुरुंगात टाकण्याची किंवा ईडीची भीती नाही,” असे ते म्हणाले. . यावेळी उपस्थित असलेले सलील देशमुख आणि त्यांचे वडील अनिल देशमुख यांचे उदाहरण देत, “अनिल देशमुख सरकारसमोर झुकले नाहीत, ते बाहेर आले आणि त्यांनी पुन्हा आपला पंजा सरकारच्या नरडीवर ठेवला,” असे राऊत म्हणाले.