Photo – गब्बर, स्पायडर मॅन आणि वोट चोरांचे मुखवटे!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘गर्जना’ मोर्चाच्या निमित्ताने चर्चा रंगली ती मुंबईच्या रस्त्यावर उतरलेल्या हटक्या कॅरेक्टर्सची. स्पायडर मॅनची एंट्री, गब्बरचा दरारा आणि ज्ञानेश कुमारांचे मुखवटे यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. जेन-झी आणि तरुणाईने मोर्चाला वेगळे रूप दिले.

मोर्चात स्पायडर मॅन दिमाखात उतरला. ‘एकवेळ माझे जाळे तोडू शकता, पण भ्रष्ट केंद्रीय यंत्रणांचे जाळे कसे तोडायचे,’ असा थेट सवाल त्याने केला. बॉलीवूडचा सर्वात मोठा व्हिलन ठरलेला गब्बर सिंग आतापर्यंत ‘कितने आदमी थे’ असे विचारताना दिसला. आज मात्र मोर्चात त्याने ‘आपली किती मतं चोरीला गेली,’ याचा हिशेबच मांडला. ‘शोले’तील गब्बरच्या भूमिकेत वेषांतर करून आलेल्या जालनाच्या मनोज निर्मल यांनी निवडणूक आयोगाच्या भ्रष्ट कारभारावर हल्ला चढवला. ‘गर्जना’ मोर्चात अनेक आगळ्यावेगळ्या संकल्पना लढवून निवडणूक यंत्रणेचा जाहीर आणि नाटय़मय निषेध होताना दिसून आला. मोर्चेकऱ्यांची क्रिएटिव्हिटी ओसंडून वाहत होती. जनतेच्या मनातील संतापाचा कल्पक आविष्कार आज मुंबईच्या रस्त्यावर दिसून आला.

भगव्या रंगाने सजवलेल्या बाईकवरून कट्टर शिवसैनिक मोहन यादव पुण्याच्या केसनंद गावातून मोर्चात सहभागी झाले.

‘आम्ही गिरगांवकर’ संस्थेच्या हटके पोस्टरने लक्ष वेधले. वोट चोरी म्हणजे मुंबईला शाकाहारी करण्याचा डाव असल्याचा आरोप केला.

ईव्हीएम हटवा, लोकशाही वाचवा अशा भावना नागरिक व्यक्त करत होते. तशा आशयाचे फलकही मोठय़ा प्रमाणात झळकले.

वोट चोरीविरोधात लोकांमध्ये संताप आहे. प्रतीकात्मकरीत्या ईव्हीएम मशीनचे श्राद्ध घालून वोटचोरीचा अनोखा निषेध करण्यात आला.

 

चुनाव आयोग नव्हे, हा तर चुना आयोग आणि त्याचे प्रमुख ज्ञानेश कुमार यांना शिक्षा झाली पाहिजे, अशा भावना मोर्चेकऱ्यांनी व्यक्त केल्या.