
दिल्ली आणि आसपासच्या परिसरातील वाढत्या बलात्काराच्या घटनांची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले आहेत. गुन्हेगारांमध्ये कायद्याची आणि मृत्यूची भीती निर्माण होत नाही तोपर्यंत परिस्थिती बदलणार नाही, अशा शब्दांत न्यायमूर्ती जे.बी. पारडीवाला यांच्या खंडपीठाने दिल्ली पोलिसांना खडसावले आहे.
दिल्ली आणि आसपासच्या परिसरात अलीकडच्या काळात घडलेल्या बलात्कार प्रकरणांची स्वतःहून दखल घेतली. आपण काही चुकीचे केले तर निश्चित मरू (अब कुछ करेंगे तो मर जायेंगे) अशी भीती समाजकंटकांच्या मनात जोपर्यंत निर्माण होत नाहीत, तोपर्यंत हे प्रकार थांबणार नाहीत, असे न्यायालयाने नमूद केले.
महाविद्यालयीन विद्यार्थिंनींना त्रास देणाऱ्या गुंडांवर कडक कारवाई करा. अनधिकृत खानावळींवर लक्ष केंद्रित करा, जिथे समाजकंटक एकत्र येतात आणि मद्यपान करतात, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांना दिले. गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वॉर रुम स्थापन करण्याबाबत माहिती दिल्ली पोलिसांकडून न्यायालयाने मागवली आहे. तसेच गुन्हेगारांवर पाळत ठेवण्यासाठी राष्ट्रीय डेटाबेसचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.



























































