सामना अग्रलेख – संगीत ‘कोह्याची पिल्ले’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भारताच्या मतदार यादीतून निवडणूक आयोगाने मनमानी पद्धतीने 13 कोटी लोकांची नावे वगळली. महाराष्ट्रातून दोन कोटी लोकांना मतदार यादीतून काढले. ही एक प्रकारे मनमानी आहे व याविरुद्ध लोकांनी रस्त्यावर येऊन मोर्चा काढला तर भाजपला ते रडगाणे किंवा कोल्हेकुई वाटत आहे. आर. के. सिंह हे देशाचे गृह सचिव होतेच, पण मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळातदेखील होते. मग इतका हुशार अधिकारी ‘एसआयआर’विषयी जे परखडपणे सांगतोय ती कोल्हेकुई आहे हे फडणवीस वगैरे लोकांनी जाहीर करावे. ‘सूर्याची पिल्ले’ नावाचे एक नाटक मराठी रंगभूमीवर गाजले. फडणवीस, शेलार वगैरेंची ‘कुईकुई’ पाहता संघ विचाराच्या नाटककाराने ‘कोह्याची पिल्ले’ हे तीन–चार अंकी संगीत नाटक रंगभूमीवर आणायला हरकत नाही!

मुंबईला जाग आली की देशाच्या डोळय़ांवरची झापडे उघडतात असे इतिहास सांगतो. बेइमान निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात मुंबईत निघालेल्या अतिविराट मोर्चाने तेच सिद्ध केले आहे. मोर्चा ‘ठाकरें’चा असला तरी महाविकास आघाडीसह अनेक लोकशाहीप्रेमी संघटना व जनता ज्ञानेश यांच्या विरुद्धच्या मोर्चात उतरली. ‘‘महाराष्ट्रात झालेला ‘एसआयआर’ रद्द करा. ईव्हीएम मशीन हटवून पुन्हा मतपत्रिकेवर निवडणुका घ्या,’’ अशी साधी सरळ मागणी मोर्चातील लाखो लोकांची होती व ती मागणी न्याय्य आहे. मात्र इतक्या मोठय़ा मोर्चावर भाजपच्या लांडग्यांनी काय प्रतिक्रिया द्यावी? तर आपले मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘‘ठाकरे आपली जमीन शोधत आहेत म्हणून मोर्चा काढला. त्यांना विस्मरण झाले आहे,’’ तर मंत्री शेलार यांनी सांगितले की, ‘‘हा मोर्चा चिरकूट आहे तर त्यांच्या मागण्या म्हणजे कोल्हेकुई आहे.’’ भ्रष्ट निवडणूक आयोग एका झटक्यात कोटय़वधी लोकांचा मताधिकार काढून भाजपच्या विजयास हातभार लावतो यास कोल्हेकुई म्हणणे हा जनतेचा अपमान आहे. बरं बाबांनो, विरोधी पक्षाचा मोर्चा ही कोल्हेकुई वगैरे आहे हे मान्य करू, पण सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांनी कालच निवडणूक आयोगाचे थोबाड पह्डत सांगितले की, मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवणारी ‘एसआयआर’ प्रक्रिया ही मनमानी आहे. श्री. भुयान पुढे म्हणतात, ‘‘कोटय़वधी नागरिकांना मतदानाच्या

अधिकारापासून वंचित ठेवणारी

कोणतीही प्रक्रिया मूलभूतपणे मनमानी आणि घटनात्मक व्यवस्थेचे उल्लंघन करणारी आहे.’’ ते म्हणतात, ‘‘मतदार यादीतून फक्त मृत मतदारांचेच नाव वगळले जाऊ शकते. मात्र कोणत्याही परिस्थितीत विद्यमान मतदाराचे नाव त्याला पूर्वसूचना न देता आणि आपली बाजू मांडण्याची संधी न देता मतदार यादीतून वगळले जाऊ शकत नाही.’’ इतके परखड मत मांडणाऱ्या न्या. भुयान यांनीही कोल्हेकुई केली आहे असे भाजपच्या बेडकांना म्हणायचे आहे का? ‘एसआयआर’ म्हणजे उघडपणे भाजपला विजयासाठी मदत करणारी योजना आहे व ज्ञानेश कुमार यांनी निवडणूक आयोगाचे अधिष्ठान भाजपच्या चरणी अर्पण केले. अनेक राज्ये भाजपने जिंकली ती फक्त ज्ञानेश कुमार यांच्यासारख्या संविधानिक पदावर बसलेल्या लोकांच्या बेइमानीमुळे. न्या. भुयान सांगतात, ‘‘भारतीय नागरिकांच्या व्यक्तिमत्त्वापासून मतदानाचा अधिकार पिंवा मतदार यादीत नाव समाविष्ट होण्याचा अधिकार वेगळा करता येत नाही. हे म्हणजे शरीरातून आत्मा काढून घेण्यासारखे ठरेल.’’ भारताच्या मतदार यादीतून निवडणूक आयोगाने मनमानी पद्धतीने 13 कोटी लोकांची नावे वगळली. महाराष्ट्रातून दोन कोटी लोकांना मतदार यादीतून काढले. ही एक प्रकारे मनमानी आहे व याविरुद्ध लोकांनी रस्त्यावर येऊन मोर्चा काढला तर भाजपला ते रडगाणे किंवा कोल्हेकुई वाटत आहे. हा

सत्तेचा माज

आहे आणि ही सत्ता भाजप ज्ञानेश कुमार यांच्यासारख्या चोरांना शिरजोर करून भोगत आहे. मुंबईत लाखो लोक रस्त्यावर हाती तिरंगा घेऊन आले. त्यांना रडगाणे म्हणणे हा तिरंग्याचाही अपमान आहे. मोदींसारखा माणूस रोज रडण्याचे ढोंग करतो. असा एखादा कोणी रडला तर ते रडगाणे ठरते, परंतु जेव्हा पाच-दहा लाख लोक एकत्र रडू लागतात तेव्हा एवढा हलकल्लोळ होतो की, हुकूमशाहीची राजसत्ता उलथून पडते. त्या ‘रडगाण्या’तून बंडाचा वणवा पेटतो. आपल्या देशात आता तसा वणवा पेटायला सुरुवात झाली आहे. न्या. भुयान यांचे ‘एसआयआर’वरील परखड मत या वणव्याला नैतिक बळ देणारे आहे. माजी गृह सचिव आर. के. सिंह यांनीदेखील भाजपवाल्यांच्या भाषेत ‘कोल्हेकुई’ केली आहे की, ‘‘निवडणूक आयोगाने देशभरात राबवलेली ‘एसआयआर’ प्रक्रिया पूर्णपणे बेकायदेशीर आहे. कोणतीही योग्य चौकशी न करता, नोटीस-सुनावणी न घेता लाखो मतदारांची नावे मतदार यादीतून बेकायदेशीरपणे वगळण्यात आली आहेत. हे कृत्य कायद्याच्या कलम 22 चे उल्लंघन आहे.’’ आर. के. सिंह हे देशाचे गृह सचिव होतेच, पण मोदींच्या पेंद्रीय मंत्रिमंडळातदेखील होते. मग इतका हुशार अधिकारी ‘एसआयआर’विषयी जे परखडपणे सांगतोय ती कोल्हेकुई आहे हे फडणवीस वगैरे लोकांनी जाहीर करावे. ‘सूर्याची पिल्ले’ नावाचे एक नाटक मराठी रंगभूमीवर गाजले. फडणवीस, शेलार वगैरेंची ‘कुईकुई’ पाहता संघ विचाराच्या नाटककाराने ‘कोह्याची पिल्ले’ हे तीन-चार अंकी संगीत नाटक रंगभूमीवर आणायला हरकत नाही!