
घोटाळेबाज मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या हकालपट्टीच्या मागणीसाठी इंडिया आघाडीचे खासदारांनी दिल्लीत ‘लोकशाही वाचवा मोर्चा’ काढला होता. संसद भवनापासून सुरू झालेला हा मोर्चा निवडणूक आयोगाच्या मुख्यालयापासून 100 मीटरवर असताना पोलिसांनी हा मोर्चा रोखला त्यामुळे विरोधी खासदारांनी त्या ठिकाणीच ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
या मोर्चात लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, समाजवादी पार्टीचे खासदार व अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासह इंडिया आघाडीतील सर्व खासदार सहभागी झाले आहेत.



























































