
शिवसेनेचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप पुर्णेकर यांच्या हत्येनंतर संपूर्ण ठाणे शहरात संतापाची लाट उसळली आहे. या हत्येचा निषेध करण्यासाठी शिवसेनेसह सर्वपक्षीयांचा भव्य मोर्चा शुक्रवार 9 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 वाजता पोलीस आयुक्त कार्यालयावर काढण्यात येणार आहे. या मोर्चाकरिता परवानगी मिळावी असे पत्र सर्वपक्षीयांच्या वतीने पोलिसांना पाठवण्यात आले आहे.
प्रदीप पुर्णेकर यांची 29 सप्टेंबर रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. यानिमित्ताने ठाण्यातील वाढती गुन्हेगारी, ड्रग्जमाफिया, एका मागून एक होणाऱ्या हत्या याचा पर्दाफाश झाला आहे. सांस्कृतिक नगरी असलेल्या ठाण्याचे स्वरूप गुन्हेगारी नगरी असे होत असून त्याविरोधात सर्वपक्षीय एकवटले आहेत. वाढती गुन्हेगारी, ड्रग्ज माफियांचे पसरलेले जाळे आणि नागरिकांची सुरक्षा यावर आवाज उठवण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
शिवसेना नेते राजन विचारे, ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, मनसेचे नेते अविनाश जाधव, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल पिंगळे, धर्मराज्य पक्षाचे राजन राजे यांच्या सहीचे पत्र परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांना पाठवले आहे. हा मोर्चा ठाणे महापालिका मुख्यालयापासून ते पोलीस आयुक्तालयापर्यंत निघणार आहे. मोर्चासाठी परवानगी द्यावी अशी विनंती पत्राद्वारे करण्यात आली आहे.





























































