प्रत्येक FIR माझ्यासाठी मेडल, 100 FIR चं माझं टार्गेट! ज्ञानेश कुमारना राजीनामा द्यावाच लागेल, राहुल गांधी आता जंतरमंतरवर आंदोलन करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मंगळवारी दिल्लीत विरोधी खासदारांनी संसद भवन ते निर्वाचन सदनपर्यंत मोर्चा काढला. मात्र पोलिसांनी हा मोर्चा रोखून धरल्याने राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह इतर खासदारांना आकाशवाणी भवन येथे आठ तास ठिय्या दिला. या प्रकरणी आता त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आली आहे. मात्र ही आपल्यासाठी एखाद्या मेडलसारखी असून एफआयआरचे शतक पूर्ण करण्याची इच्छा असल्याचे राहुल गांधी म्हणाले. विरोधी खासदारांसाठी आयोजित स्नेहभोजन कार्यक्रमानंतर ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी जंतरमंतर येथे आंदोलन करणार असल्याचीही घोषणा केली.

दिल्लीतील रणकंदननंतर बुधवारी राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी इंडिया आघाडीच्या खासदारांना स्नेहभोजनासाठी सागर रत्ना रेस्टॉरंटमध्ये आमंत्रित केले होते. जंतरमंतरहून 100 मीटर अंतरावर हे रेस्टॉरंट असून येथूनच विरोधी खासदार आंदोलनासाठी मार्गस्थ होणार आहेत. या पार्श्वभूमीवर या भागात बॅरेकेट्स लावण्यात आले असून पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तसेच कलम 163 लागू करण्यात आले आहे.

दरम्यान, राहुल गांधी यांनी माध्यमांशी संवाद साधत आंदोलनाची दिशा स्पष्ट केली. काल आम्ही जवळपास 300 खासदार मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेण्यासाठी गेलो होते. परंतु आम्हाला भेट नाकारण्यात आली. दिल्ली पोलिसांनी आम्हाला रोखले आणि येथे आंदोलन करू शकत नाहीत असे आम्हाला सांगण्यात आले. त्यामुळे आम्ही आंदोलनाचे अधिकृत ठिकाण असलेल्या जंतरमंतर येथे जाण्याचे ठरवले आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, ज्ञानेश कुमार हे आमच्यासाठी देशाचे कायदेशीर निवडणूक आयुक्त नाहीत. मोदी, अमित शहा, मोहन भागवत आणि ज्ञानेश कुमार यांनी देशाची लोकशाही नष्ट केली आहे. मी काल देखील म्हटलो की, ज्यांनी हे कृत्य केले आहे ते देशद्रोही असून आम्ही त्यांच्यावर कारवाई करून. मी आताही हेच सांगतोय की, ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावाच लागेल.

एफआयआर हे मेडल

माझ्यावर 45 एफआयआर दाखल असून मला शतक गाठण्याची इच्छा आहे. माझ्याविरुद्ध 100 एफआयआर दाखल व्हाव्यात अशी माझी इच्छा आहे. प्रत्येक एफआयआर माझ्यासाठी एखाद्या मेडलसारखी आहे, असेही राहुल गांधी म्हणाले.

कितीही गुन्हे दाखल झाले तरी घाबरणार नाही – खरगे

इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्ष आज जंतरमंतर येथे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलन करणार आहेत. आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील. निवडणूक आयोगाकडून सुरू असलेल्या प्रत्येक कारवाईमागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हात आहे. मोदी लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन देशातील जनतेला त्यांचा अधिकार हिरावून घेतला जात असल्याचे सांगू इच्छित आहेत. जनतेच्या अधिकारांच्या रक्षणासाठी आमच्यावर कितीही गुन्हे दाखल झाले, तरी आम्ही घाबरणार नाही आणि आंदोलनातून माघारही घेणार नाही, असा निर्धार राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केला.