
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात विरोधकांनी पुकारलेल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी गुरुवारी दिल्लीला रवाना झाल्या आहेत. इंडिया आघाडीच्या नेत्यांनी केलेल्या विशेष आग्रहाखातर आपण दिल्लीला जात असल्याचे त्या म्हणाल्या. तसेच इंडिया आघाडीच्या नेत्यांनी ८ किंवा ९ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपतींच्या भेटीची वेळ मागितली असून, राष्ट्रपतींना भेटणाऱ्या नेत्यांच्या यादीत आपल्याही नावाचा समावेश असल्याचे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. ANI ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
आपल्या दिल्ली दौऱ्याविषयी माहिती देताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, सुरुवातीला आपण स्वतः न जाता अभिषेक बॅनर्जी यांना दिल्लीला पाठवण्याचा विचार केला होता. मात्र आघाडीच्या नेत्यांनी स्वतः उपस्थित राहण्याचा आग्रह केला. सध्या सुरू असलेल्या या मोठ्या आंदोलनापासून दूर राहणे योग्य दिसले नसते आणि बंगालच्या जनतेचीही आपण दिल्लीला जावे अशीच इच्छा असल्याने आपण हा निर्णय घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे. सध्या दुर्गापूजेचा उत्सव सुरू असून सर्वजण व्यस्त असले तरी, या महत्त्वाच्या लढ्यासाठी दिल्लीला जाणे आवश्यक असल्याचे त्या म्हणाल्या. राष्ट्रपतींनी भेटीची वेळ दिल्यास तिथे आपली उपस्थिती गरजेची आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
दिल्लीत सुरू असलेल्या इंडिया आघाडीच्या आंदोलनाबाबत बोलताना ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांना मिळालेल्या वागणुकीवर तीव्र चिंता व्यक्त केली. देशभरात प्रत्येकाला शांततापूर्ण आंदोलन करण्याचा अधिकार आहे, मात्र प्रियांका गांधींसोबत जे घडले ते अत्यंत अयोग्य होते. आपण आतापर्यंत अनेक अत्याचार पाहिले आहेत. प्रत्येकाच्या घरी बहीण, आई आणि मुली असतात, त्यामुळे महिलांचा नेहमी सन्मान राखला गेला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.


























































