
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी गुरुवारी अयोध्येत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला. “अयोध्येतून उभे राहण्यासाठी भाजपला उमेदवारच मिळत नाहीये, त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनीच इथून निवडणूक लढवून पाहावी,” असे थेट आव्हान त्यांनी दिले आहे. आगामी २०२७ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यादव यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.
अखिलेश यादव आज अयोध्येच्या दौऱ्यावर आहेत. माजी मंत्री आणि अयोध्येचे माजी आमदार तेज नारायण पांडे ऊर्फ पवन पांडे यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या श्रीमद्भागवत कथा ज्ञान यज्ञाला उपस्थित राहण्यासाठी ते आले होते. हा कार्यक्रम अयोध्येपासून सुमारे १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या कृष्णापूर खानपूर रसूलाबाद गावात आयोजित करण्यात आला होता. या दौऱ्यात त्यांनी भागवत कथेला उपस्थित राहून धार्मिक प्रवचन ऐकले.
यावेळी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडताना अखिलेश यादव म्हणाले की, भाजपची स्थिती अयोध्येत इतकी बिकट झाली आहे की त्यांना येथून उभे करण्यासाठी उमेदवारही सापडत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीच येथून आपले नशीब आजमावून पाहावे.


























































