लाठीमार हा पर्याय नाही, ती आपलीच मुले आहेत; आंदोलक विद्यार्थ्यांवरील कारवाईवरून मुरली मनोहर जोशींचे खडे बोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या लाठीमारवरून भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री डॉ. मुरली मनोहर जोशी यांनी केंद्र सरकारला आणि प्रशासनाला खडे बोल सुनावले आहेत. “विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्या सहानुभूतीपूर्वक ऐकून घेतल्या पाहिजेत. त्यांच्यावर लाठीचार्ज करणे पूर्णपणे चुकीचे असून, यातून कोणत्याही समस्येवर तोडगा निघणार नाही, कारण ती शेवटी आपलीच मुले आहेत,” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. याचबरोबर त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त वाद आणि नवीन शैक्षणिक धोरणावरही भाष्य केले आहे.

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत बोलताना मनोहर जोशी म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या ज्या काही रास्त मागण्या असतील, त्या पूर्ण सहानुभूतीने ऐकल्या गेल्या पाहिजेत. लाठीमारचा मार्ग पूर्णपणे चुकीचा असून या मार्गाने कोणत्याही समस्येवर कधीच तोडगा निघू शकत नाही. जर एखादी अडचण असेल, तर विद्यार्थ्यांसोबत बसून चर्चा केली पाहिजे.

जोशी यांनी एक उदाहरण देत म्हटलं की, “जर एखाद्या मुलाने वडिलांकडे नवीन कोट मागितला आणि वडिलांकडे पैसे नसतील, तर ते त्याला समजावून सांगतात की आता पैसे नाहीत, पुढच्या वेळी नक्की घेऊन देईन. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचे काम का होऊ शकले नाही, त्यात काय अडचणी आहेत आणि ते कधी होईल, हे त्यांना समजावून सांगणे गरजेचे आहे. केवळ बळाचा वापर करून हे प्रकरण हाताळणे योग्य नाही.”