
तारणहार म्हणून सिद्धेश लाडची क्रिकेट वर्तुळात ओळख आहे. कारण मुंबईच्या संघाला कठीण परिस्थितीमधून बऱयाचदा त्याने बाहेर काढले आहे आणि संघाला रणजी ट्रॉफीही जिंकवून दिली आहे. पण आपण संघाचे तारणहार आहोत याचा विचार तो कधीच करत नाही. रणजी हंगामापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत सिद्धेशने ही गोष्ट आवर्जून सांगितली. स्वतःचा विचार करण्यापेक्षा संघाचा विजय महत्त्वाचा आहे, असे मी मानतो. धावा करणे आणि संघाच्या विजयात कसे योगदान देता येईल हे पाहणे माझी प्राथमिकता आहे, असे सिद्धेश यावेळी म्हणाला.
सिद्धेश लाडच्या नेतृत्वाखालील मुंबईचा युवा रविवारी वानखेडे स्टेडियमवर चंदिगडविरुद्ध आपल्या रणजी करंडक मोहिमेला सुरुवात करत आहे. यावेळी संघाची नजर विक्रमी 43 व्या विजेतेपदावर असेल. आयुष म्हात्रेला यावेळी उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनतर्फे वानखेडे स्टेडियमवर आयोजित हंगामापूर्वीच्या पत्रकार परिषदेत सिद्धेश आणि आयुष यांनी संघाची तयारी, रणनीती आणि आगामी हंगामासाठीच्या उद्दिष्टांबद्दल माहिती दिली.
मुंबईचा कर्णधार सिद्धेशने संघाचा समृद्ध वारसा पुढे नेण्याच्या जबाबदारीबद्दल भाष्य केले. सिद्धेश म्हणाला, ‘मुंबईचा इतिहास समृद्ध आहे. आपण जिंकलेली 42 रणजी विजेतेपदे आणि संघाचे प्रतिनिधित्व करणाऱया खेळाडूंचा वारसा पाहता मुंबईची जर्सी परिधान करताना नेहमीच दबाव असतो. पण एक संघ म्हणून त्या दबावापासून पळून जाण्याऐवजी आम्ही त्याचा स्वीकार करतो. मुंबईचे प्रतिनिधित्व करताना इतिहास आणि संस्कृती जोडली जाते. या नवीन हंगामासाठी आम्ही उत्सुक आहोत.’
युवा पिढीलाही ‘रेड बॉल’ क्रिकेट आवडते
उप कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर आयुष म्हणाला की, ‘मुंबईचा उपकर्णधार म्हणून निवड होणे ही माझ्यासाठी एक मोठी जबाबदारी आणि अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे. या संघाचा दर्जा आणि मुंबई क्रिकेटसाठी रणजी करंडकाचे असलेले महत्त्व लक्षात घेता हे अधिकच विशेष वाटते. सिद्धेश यांनी मला पाठिंबा दिला आणि संघात नेहमीच सहज व सुरक्षित वाटेल असे वातावरण निर्माण केले. युवा पिढीला फक्त फास्ट क्रिकेट आवडते, असे म्हटले जाते. पण युवा पिढीला ‘रेड बॉल’ क्रिकेटही आवडते. कारण या ‘रेड बॉल’ क्रिकेटमध्ये खेळाडूंची खरी परिक्षा होते.’
महेंद्रसिंग धोनीकडून शांत राहायला शिकलो
आयुष पुढे म्हणाला की, ‘मैदानावर शांत राहण्याचे महत्त्वही मी शिकलो आहे. महेंद्रसिंग धोनी नेहमीच कसे शांत राहतात हे आपण पाहिले आहे. त्यांच्याकडून मी शिकलेली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे राग कदाचित पाच मिनिटेच टिकतो, पण रागाच्या भरात घेतलेले निर्णय अनेकदा चुकीचे ठरू शकतात. एकदा का तुम्ही शांत झालात की, अधिक चांगल्या प्रकारे विचार करू शकता. मी तोच दृष्टिकोन स्वीकारण्याचा, मैदानावर संयम राखण्याचा आणि स्वतःसाठी व संघासाठी चांगले निर्णय घेण्याचा प्रयत्न केला आहे.’
मुंबईच्या 16 सदस्यांच्या संघात अनुभवी आणि युवा प्रतिभांचा सुरेख संगम पाहायला मिळतो. यशस्वी जैसवाल, सर्फराज खान आणि मुशीर खान यांसारख्या खेळाडूंमुळे संघाची ताकद वाढली आहे. कारण हा संघ आता विक्रमी 43 व्या रणजी करंडक विजेतेपदाच्या दिशेने वाटचाल करत आहे. कर्णधार सिद्धेशकडे नेतृत्वाचा ‘फर्स्ट क्लास’ क्रिकेटचा मोठा अनुभव आहे. त्याने आपल्या देशांतर्गत कारकीर्दीत 5,600 हून अधिक धावा केल्या आहेत. 2025-26 च्या हंगामात मधल्या फळीतील एक महत्त्वाचा खेळाडू म्हणून सिद्धेशने कठीण प्रसंगांमधून मुंबईला बाहेर काढले आहे.
रणजी ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यासाठी मुंबईचा संघ
सिद्धेश लाड (कर्णधार), आयुष म्हात्रे (उपकर्णधार), यशस्वी जैसवाल, दिव्यांश सक्सेना, मुशीर खान, सर्फराज खान, सुवेद पारकर, आकाश आनंद (यष्टिरक्षक), हार्दिक तामोरे (यष्टिरक्षक), शम्स मुलानी, तनुष कोटियन, अथर्व अंकोलेकर, तुषार देशपांडे, मोहित अवस्थी, सिल्व्हेस्टर डिसूझा आणि ओंकार तरमळे.

























































