लष्कराच्या प्रसंगावधामुळे मणिपूरमध्ये मोठी दुर्घटना टळली; शांखलोक-पिलोंग मार्गावर 27 आयईडी निकामी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आसाम रायफल्स आणि लष्कराच्या बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकांनी मणिपूरच्या कामजोंग जिल्ह्यातील 8 किमी लांबीच्या रस्त्यावर 27 आयईडी शोधून ती निकामी केली आहेत. या मोहिमेमुळे शांतता आणि सुरक्षा भंग करण्याचे प्रयत्न हाणून पाडण्यात आले, असे सुरक्षा दलाने म्हटले आहे.

गुप्तचर माहितीच्या आधारे लष्कराने ही कारवाई केली. सुमारे 48 तास चाललेल्या या मोहीमेत शांखलोक-पिलोंग मार्गावरील सर्व 27 स्फोटके सुरक्षितपणे निकामी करण्यात आली, असे आसाम रायफल्सने एक्स वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. ही स्फोटके कोणी पेरली होती, याचा उल्लेख पोस्टमध्ये करण्यात आलेला नाही.

भारत-म्यानमार सीमेला लागून असलेल्या मणिपूरमधील पाच जिल्ह्यांपैकी कामजोंग हा एक जिल्हा आहे. चुराचंदपूर, तेंगनौपाल, चंदेल, कामजोंग आणि उखरुल या जिल्ह्यांची म्यानमारशी 398 किमी लांबीची कुंपण नसलेली आंतरराष्ट्रीय सीमा आहे, जिचे रक्षण आसाम रायफल्स करते.