Mega Block – मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विविध अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी रविवारी 11 ऑक्टोबर रोजी मध्य रेल्वेवर माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान आणि हार्बर मार्गावर सीएसएमटी आणि चुनाभट्टी/वांद्रे स्थानकांदरम्यान मेगा ब्लॉक आयोजित करण्यात आला आहे. माटुंगा-मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाउन धीम्या मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

ब्लॉक कालावधीत सीएसएमटी मुंबईहून सकाळी 10.14 ते दुपारी 3.32 पर्यंत सुटणाऱ्या डाउन धीम्या मार्गावरील गाड्या माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील. मुलुंड स्थआनकावर डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि गंतव्यस्थानी 15 मिनिटे उशिरा पोहोचतील.

ठाण्याहून सकाळी 11.07 ते दुपारी 3.51 दरम्यान सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील गाड्या मुलुंड स्टेशनवर अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि सायन स्टेशनवर थांबतील आणि त्यानंतर त्यांना माटुंगा स्टेशनवर अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या गंतव्यस्थानी 15 मिनिटे उशिरा पोहोचतील. सीएसएमटी येथून सकाळी 11.00 ते सायंकाळी 5.00 दरम्यान सुटणाऱ्या/येणाऱ्या सर्व अप आणि डाउन लोकल गाड्या 15 मिनिटे उशिरा पोहोचतील.

सीएसएमटी ते वाशी/बेलापूर/पनवेल हार्बर लाईन सेवा सकाळी 11.16 ते सायंकाळी 4.47 पर्यंत स्थगित राहतील आणि वांद्रे/गोरेगाव येथून येणारी हार्बर मार्गावरील लोकल सेवा सकाळी 10.48 ते सायंकाळी 4.43 पर्यंत स्थगित राहील.

पनवेल/बेलापूर/वाशी येथून सुटणारी सीएसएमटीकडे जाणारी अप हार्बर मार्गावरील सेवा सकाळी 9.53 ते सायंकाळी 3.20 पर्यंत स्थगित राहील आणि गोरेगाव/वांद्रे येथून सुटणारी सीएसएमटीकडे जाणारी अप हार्बर लोकल सेवा सकाळी 10.45 ते सायंकाळी 5.13 पर्यंत स्थगित राहील.

ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. 8) दरम्यान दर 20 मिनिटांच्या अंतराने विशेष लोकल चालवण्यात येतील. ठाणे-वाशी/नेरुळ-ठाणे स्थानकांदरम्यानची ट्रान्स हार्बर लाईन सेवा वेळापत्रकानुसार धावेल. नेरुळ/बेलापूर-उरण-नेरुळ/बेलापूर स्थानकांदरम्यानची पोर्ट लाईन सेवा वेळापत्रकानुसार धावेल. हार्बर लाईनच्या प्रवाशांना सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.00 पर्यंत मेन लाईन आणि पश्चिम रेल्वेमार्गे प्रवास करण्याची परवानगी असेल.

पश्चिम रेल्वेवर रात्रीकालीन ब्लॉक

ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी शनिवारी मध्यरात्री माहीम आणि मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान रात्रीकालीन जंबो ब्लॉक आयोजित करण्यात आला आहे. मध्यरात्री 00.25 ते 4.25 या वेळेत माहीम आणि मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान जंबो ब्लॉक लागू करण्यात येईल. ब्लॉकच्या कालावधीत, अंधेरी/सांताक्रूझ आणि चर्चगेट स्थानकांदरम्यान सर्व जलद मार्गावरील गाड्या धीम्या मार्गावर चालवल्या जातील.