
मुंबई-गोवा महामार्गावर ओणी नजीकच्या गगनगिरी महाराज आश्रमाजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या एका मद्यधुंद स्विफ्ट कारचालकाने पुढे जाणाऱ्या दुचाकीला पाठीमागून भीषण धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार रस्त्याच्या कडेला फेकला गेल्याने गंभीर जखमी झाला, तर दुचाकी सुमारे 15 ते 20 मीटर फरफटत जाऊन कारच्या बोनेटखाली चिरडली गेली. या प्रकरणी राजापूर पोलिसांनी कार चालकाविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
रत्नागिरी तालुक्यातील चिंचखरी येथील रहिवासी शुभम आत्माराम बोरकर (27) हे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या होमलोन विभागात कार्यरत आहेत. गुरुवारी, 8 ऑक्टोबर रोजी बँकेच्या कामकाजानिमित्त ते आपल्या ॲक्टिव्हा दुचाकीने राजापूर शाखेतील काम आटोपून लांजा शाखेकडे निघाले होते. दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गाने जात असताना खरवते गावच्या हद्दीत गोव्याकडून भरधाव वेगात आलेल्या लाल रंगाच्या स्विफ्ट कारने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीचालक रस्त्याच्या बाजूला फेकला गेला. कारचालकाने दुचाकीला सुमारे 15 ते 20 मीटर फरफटत नेली. यात दुचाकी कारच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी शुभम बोरकर यांना तातडीने राजापूर येथील जोशी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयित चालक आर्यन ढबले याची ब्रेथ ॲनालायझर मशिनद्वारे तपासणी केली असता, त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्याला पुढील वैद्यकीय तपासणीसाठी राजापूर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. या प्रकरणी शुभम बोरकर यांच्या फिर्यादीवरून राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, राजापूर पोलीस पुढील तपास करत आहेत.



























































