
दापोली तालुक्यातील लाडघर येथील शेतकऱ्यांच्या मेहनतीवर निसर्गाची वक्रदृष्टी फिरल्याने हाती आलेले भाताचे पिक वाया गेल्यात जमा आहे. दापोली तालुक्यातील लाडघर हे पर्यटनाचे प्रमुख केंद्र बनले आहे. येथे शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने पर्यटन व्यवसायाबरोबरच येथे मोठ्या प्रमाणात भातशेती सुद्धा केली जाते. या वर्षीच्या खरीप हंगामात सुरुवातीला बऱ्यापैकी पाऊस झाल्याने यावर्षी भातशेतीचे पिक चांगले आले होते. मात्र शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले भात शेतीचे पिक बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांच्या हातून पार हिरावून नेले आहे.
लाडघर हे गाव दापोली शहरापासून साधारणपणे 8 ते 9 किलो मीटर अंतरावर आहे. या गावातील बहुतांश लोकांचा शेती हाच प्रमुख व्यवसाय आहे. त्यामुळे या गावातील शेतकरी हे विविध प्रकारची शेती करतात. त्यात प्रामुख्याने भात पिकाचे क्षेत्र अधिक आहे. अशा या लाडघर गावातील महसूली हद्दीत प्रवेश करतानाच आपल्याला भात शेती मोठ्या प्रमाणात असलेली दिसून येते. आता हेच लाडघर गावात दिसणारे आणि तयार होत आलेले भात शेतीपिक आडवे झाले आहे.





























































