
मानपाडा प्रभाग क्रमांक 5 मधून माझे भाऊ भूषण भोईर हे पालिका निवडणूक लढवत होते. प्रचाराच्या काळात माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी भूषण याला शिवीगाळ करून धमकावले होते. याबाबत त्यांच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार केली होती. त्याची पोलिसांनी वेळीच दखल घेतली असती तर प्रदीप पुर्णेकर यांचे हत्याकांड घडले नसते, असा आरोप शिंदे गटाचे नगरसेवक संजय भोईर यांनी आज केला.
संजय भोईर यांनी पुर्णेकर कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच आपण या कुटुंबासोबत ठामपणे असून ठाणे पोलिसांनी योग्य पद्धतीने तपास करावा, अशी मागणीही त्यांनी केली. पुर्णेकर यांची भेट घेतल्यानंतर बोलताना संजय भोईर यांनी सांगितले की, पुर्णेकर व भोईर कुटुंब यांचे भावनिक नाते असून ही हत्या आमच्या जिव्हारी लागली आहे. ठाणे पालिकेच्या निवडणुकीवेळी माझा भाऊ भूषण याला दिलेल्या धमकीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पोलिसांकडे लेखी तक्रार करूनही त्याची दखल घेतली गेली नाही. ती जर घेतली असती तर पुर्णेकर यांची हत्या झाली नसती, असे भोईर म्हणाले.
शिंदे यांच्या अडचणीत वाढ
आपल्या वडिलांची हत्या मीनाक्षी शिंदे व त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्या सांगण्यावरूनच झाल्याचा आरोप राम पुर्णेकर यांनी वारंवार केला. आता शिंदे पती-पत्नीविरोधात खुद्द एकनाथ शिंदे यांच्या गटाचे नगरसेवक संजय भोईर यांनीच उघड भूमिका घेतल्याने मीनाक्षी शिंदे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
























































